तूर खरेदी केंद्राचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ

बेलोरा, शिरजगाव बंड येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद







अमरावती, दि. 7 : चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत आज राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी तूर खासगी व्यापाऱ्यांना न विकता नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करुन तूर विक्री करावी, असे आवाहन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिश बोंडे, उपसभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, माजी सभापती मंगेश देशमुख, संचालक सुभाष मसराम, विनोद जवंजाळ, मनोज नांगलिया, सचिव मनीष भारंबे यांच्यासह नाफेडचे अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कडू यांच्या दौरा प्रसंगी, बेलज येथील सेंद्रीय गुळ उद्योग केंद्राला त्यांनी सदिच्छा भेट दिली. तेथील गुळ निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना गुळ निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राहुटीच्या माध्यमातून गोरगरीबांना दिलासा

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत राहुटी आज चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा व शिरजगाव बंड येथे आयोजित करण्यात आली होती. गोरगरीब जनतेचे प्रश्न, तक्रारी, शासकीय विभागाशी निगडीत कामे आदींचा निपटारा गावातच एका ठिकाणी व्हावा, या उदात्त हेतूने राहुटी हा उपक्रम जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीबांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.
चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्राम पंचायत परिसर आणि शिरजगाव बंड येथील श्री. शिवाजी हायस्कुलच्या प्रांगणात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेलोरा व शिरजगाव बंड येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
 यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. आज आयोजित राहुटीत बहुसंख्य दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांचे सानुग्रह मदतीचे अर्ज भरुन घेण्यात आले. त्यांना येत्या पंधरा दिवसात मदत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती