Monday, February 3, 2020

कुरळपूर्णा- हिरूळपूर्णा येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद









       सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम
                                              -जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 

अमरावती, दि. 3 : सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे वेळेत पूर्ण व्हावी, जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा व त्यानंतर हिरुळ पूर्णा येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत:  शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन,  आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
                                    लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा                               
दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला. 
राहुटीत नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्ज वाटप कक्ष यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांना योग्य मार्गदर्शनासह त्यांच्या प्रश्नांचा तत्काळ निपटाराही होत आहे.  

     ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...