Thursday, February 6, 2020

आसेगावपूर्णा, तळवेल येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद


राहुटीच्या माध्यमातून अडीच लाख तक्रारींचा निपटारा
-         जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 
 सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम
अमरावती, दि. 6 : सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे राहुटीच्या माध्यमातून होत आहेत. सन 2005 पासून ते आतापर्यंत सुमारे अडीच लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.
चांदुरबाजार तालुक्यातील आसेगावपूर्णा येथील ग्राम पंचायतीच्या आवारात आणि त्यानंतर तळवेल येथील आठवडी बाजार चौकात राहुटी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नांदेडचे आमदार संभाजी पवार त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती पवार तसेच शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की,  सर्वसामान्यांचे महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे एकाच ठिकाणी तत्काळ होण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण राहुटीतून करण्यात येत आहे. गावागावांत राबविण्यात येणाऱ्या राहुटीच्या माध्यमातून राज्यमंत्री श्री. कडू आमदार असतांना, वर्ष 2005 पासून ते आतापर्यंत सुमारे अडीच लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत.
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील आसेगावपूर्णा व त्यानंतर तळवेल येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तेथील ग्रामस्थांनी व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. आज आयोजित राहुटीत अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी शाळेत होत असलेल्या कॉपीचा प्रकार बंद करण्यासंबंधीचे निवेदन राज्यमंत्र्यांना सादर केले. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांच्या राहुटी उपक्रमाला आर्वजून उपस्थित राहिलेले नांदेडचे आमदार संभाजी पवार व सौ. पवार यांनी अश्या प्रकारचा राहुटी उपक्रम आपल्या मतदार संघात राबविणार असल्याचे
सांगितले.
दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
राहुटीच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला.
00000










No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...