खनिज प्रतिष्ठान अंतर्गत येणारी प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर




अमरावती, दि. 20 : जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून 43 विकास कामे करण्यासाठी 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
 विभागीय आयुक्त कार्यालयात आज जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत प्राप्त व वितरीत निधी संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत 13 कोटी 30 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 43 कामाकरीता रुपये 6 कोटी 65 लक्ष निधी विकास कामे पूर्ण करण्यासाठी संबंधीत शासकीय यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासन राबवित असलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य विकास आदी योजनेतून निधीची उपलब्धता झाल्याने लोककल्याणकारी कामे कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. प्राप्त निधीच्या अनुषंगाने चांदूरबाजार, भातकुली, अमरावती, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर तसेच अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर आराखडा व निधीची उपलब्धतेनुसार अपूर्ण कामे संबंधीत यंत्रणांनी गतीने पूर्ण करावी. मार्च 2020 अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
            त्या पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागाला विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तत्काळ मागणी नोंदवावी. मुरमाळ जमीन व इतर क्षेत्रात पांदण रस्त्याची कामे गतीने पूर्ण करावी. तिवसा तालुक्यातील क्रीडा संकुलाचा रस्ता बांधकाम व टाकरखेडा येथील पुल बांधकाम आदी कामे प्राधान्याने पूर्ण करावी. जी कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होऊ शकत नाही, अशा कामांचा निधी तत्काळ नियोजन विभागाला वर्ग करण्यात यावा. तसेच ज्या कामांना अधिक निधीची आवश्यकता असल्यास त्यासंदर्भात प्रस्तावानुरुप निधीची मागणी करावी.
            खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा पायाभूत सुविधा निर्मितीवरच खर्च होणे अपेक्षीत आहे. लोकहितकारी विकास कामे करतांना ती कायमस्वरुपी व गुणवत्तापूर्ण होईल यासाठी प्रत्येक शासकीय यत्रणांनी जबाबदारीपूर्वक काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
           बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती