राहूटीतून 50 हजार अपंग प्रमाणपत्राचे वाटप









राहुटी : जनतेसाठी प्रजासत्ता दिन
                         राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 8 : गावागावात राबविण्यात येणाऱ्या राहूटीच्या माध्यमातून वर्ष 2005 पासून ते आजपर्यंत दिव्यांग बांधवांना सुमारे 50 हजार अपंग प्रमाणपत्रांचा वाटप करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज देऊरवाडा येथे दिली. प्रजा ही राजा असून लोकप्रतिनिधी व अधिकारी हे प्रजेचे सेवक आहे. गोरगरीब नागरिकांच्या हितासाठी राहूटीच्या माध्यमातून प्रजासत्ता दिन साजरा करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले
आज चांदुर बाजार तालुक्यातील नानोरी व त्यानंतर देऊरवाडा येथे राहूटीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार उमेश खोडके यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, गोरगरीब जनतेची कामे एकाच ठिकाणी त्यांच्या गावात व्हावी या उदात्त हेतूने राहूटी हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आज चांदूरबाजार तालुक्यातील राहूटीचा शेवटचा दिवस होता. राहुटीच्या माध्यमातून अनेकांना फायदा झाला आहे. त्यांची शिधा प्रत्रिका काढणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अतिक्रमण नियमानुकूल करुन पट्टे वाटप, वैद्यकीय मदतीचे अर्ज, दिव्यांग व्यक्तींचे अपंग प्रमाणपत्र तयार करणे, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ, जमीनीचे फेरफार आदी शासकीय विभागाशी निगडीत कामे गावातच पूर्ण झाली आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुध्दा सहकार्य लाभले. राहुटीत सहभागी झालेल्या सर्वांचे मनपूवर्क आभार श्री. कडू यांनी यावेळी मानले.
राहूटीच्या माध्यमातून 270 कुटुंबाचे अतिक्रमण नियमानुकूल करुन त्यांना मालकी हक्क पट्टे वाटप प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. हे राज्यात सर्व प्रथम घडले आहे. देऊरवाडा व काजळी येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात मंजूर करुन संबंधितांना सुध्दा मालकी हक्काचे पट्टे वितरण करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या कुटूबियांना मदतीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी व निवेदने स्वीकारुन त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहे. आज आयोजित दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. राहुटीच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती