Monday, February 17, 2020

विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘वैदर्भी’ चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन








महिलांनी धैर्याने संकटांचा सामना करावा
                                                            -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
* उत्कृष्ठ बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार
अमरावती, दि. 17 : महिलांमध्ये समाजाला पुढे नेण्याची मोठी ताकद आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक उन्नती करण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उमेद अभियान उपयुक्त आहे. महिलांनी सक्षमीकरणासाठी स्वत:चे निर्णय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून कणखर होणे व कुठल्याही परिस्थितीत संकटाला डगमगून न जाता धैर्याने सामना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
            येथील सांयन्सकोअर मैदानावर विभागीय आयुक्त व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय प्रदर्शनी व विक्री ‘ वैदर्भी ’ चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, विभागीय आयुक्त पियूष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उप आयुक्त (विकास) सुहास वेदमुख, प्रकल्प संचालक विनय ठमके, सहायक आयुक्त विलास जाधव, जि. प. पदाधिकारी यांच्यासह पाचही जिल्ह्यातील स्वयं सहायता बचतगटाचा महिला यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी विशेष कामगिरी केलेल्या महिला बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार व इतर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रोख रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्कारचे स्वरुप आहे.  तीन महिला बचतगटांना दोन लक्ष रुपये कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, उमेद अभियानाव्दारे ग्रामीण भागातील महिलांचे सर्वांगिण विकास करण्यात येते. या अभियानांतर्गत गरीब, गरजू कुटुंबांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी क्षमता बांधणी करुन विविध व्यवसाय व रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध करुन दिल्या जाते. महिलांचे स्वयं सहाय्यता समूह स्थापन करुन बँकाव्दारे कर्जाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिल्या जाते. महिला बचतगटाव्दारे निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर प्रदर्शनी व विक्रीचे दालन उभारण्यात येते. ईथे आयोजित प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्तम बाजारपेठ मिळणार तसेच या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळेल.
महिलांव्दारे एकजूटीने निर्माण करण्यात आलेल्या बचतगटाचे विविध उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. महिला सक्षमीकरणाला पुरस्कृत करणारे राज्य शासन असल्यामुळे महिलांना सुध्दा प्रोत्साहन मिळत आहे. महिलांनी कुठल्याही संकटांना न घाबरता निर्भयपणे धैर्याने संकटांचा सामना करावा. महिलामध्ये समाजात सुधार घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांनी काही न बोलता अन्याय सहन केले तर अन्यायग्रस्त समाजाची निर्मिती होते, तर संकटांना समोर जावून पूर्ण ताकदनिशी सामना केला तर सक्षम समाजाची निर्मिती होते. महिलांनी न बोलण्यामुळे अनेक विदारक घटना राज्यात घटत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पहिल्याचवेळी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. तुमच्यातील आतला आवाज दाबू नका, घाबरु नका, बोलते व्हा, स्वत:साठी बोला, कुटूंबातील सदस्यांना सर्व गोष्टी शेअर करा. कोणत्याही संकटांचा धैयाने सामना करा. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी या उक्तीप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी प्रत्येक संकटांचा धैर्याने सामना करा. घरात किंवा बाहेर इतरत्र घडत असलेल्या वाईट गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घ्या, वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करा, असे भावनिक आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
            महिला स्वयं सहाय्यता समूहाव्दारे उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर मॉल उपलब्ध करण्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी निर्देशित केले. याप्रसंगी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासीत केले.
श्री. सिंह म्हणाले की, उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना विभागस्तराव तसेच जिल्हास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. अभियानच्या माध्यमातून विभागात सुमारे 33 हजार महिला बचतगटांची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी 7 हजार 957 समूहांना 14 कोटी 42 लक्ष खेळते भांडवल वितरीत करण्यात आले आहे. विभागातील विविध महिला बचतगटांना बँकाव्दारे सुमारे 144 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्यांच्याव्दारे कर्ज परतफेडीचे 98 टक्के प्रमाण आहे, तर एनपीए प्रमाण अतिशय नगण्य आहे. या बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यांच्याव्दारे विविध लोकहितकारी उपक्रम सुध्दा राबविण्यात येतात. सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळणार असून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी होणार आहे.
श्री. येडगे म्हणाले की, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विभागातील पाचही जिल्ह्यांचे बचतगटांचे सात दिवस प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. विविध बचतगटांचे जवळपास 187 स्टॉल्स या प्रदशर्नीत उभारण्यात आले आहे. त्यापैकी 30 स्टॉल्स खाद्यान पदार्थचे आहे. बचतगटाव्दारे तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे प्रदर्शन याठिकाणी भरविण्यात आले आहे. बचतगटांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे दशसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कला संस्कृतीच दर्शन यावेळच्या प्रदर्शनीची थीम आहे. यासोबतच स्वच्छ भारत अभियान, प्लॉस्टीक मुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी दोन स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार आहे. मुंबईच्या महालक्ष्मी सरस च्या धर्तीवर येथील वैदर्भी प्रदर्शनी यशस्वी व दिमाखदार ठरणार आहे. जिल्ह्यात 32 हजार 957 महिला स्वयं सहायता बचतगट कार्यरत असून त्यांच्याव्दारे निर्मित उत्पादनांना बाजारपेठ मध्ये चांगली मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुरस्कार्थी महिला बचतगट :
अमरावती जिल्हा
प्रथम पुरस्कार - यशोधरा महिला स्वयं सहायता समूह, चांदूर बाजार-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- गणेश महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- संजीवनी महिला स्वयं सहाय्यता समूह, मोर्शी- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
यवतमाळ जिल्हा-
प्रथम पुरस्कार - जगदंबा महिला स्वयं सहायता समूह, पांढरकवडा -10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भीमज्योती महिला स्वयं सहाय्यता समूह, बाभूळगाव - 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- जयलक्ष्मी महिला स्वयं सहाय्यता समूह, कळंब -- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
अकोला जिल्हा
प्रथम पुरस्कार – संत गजानन महिला स्वयं सहायता समूह, अकोट-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- नवोदय महिला स्वयं सहाय्यता समूह, अकोला- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, मुर्तीजापूर - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
बुलडाणा जिल्हा
प्रथम पुरस्कार – आदर्श महिला स्वयं सहायता समूह, जळगावं जामोद-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- भारतीय महिला स्वयं सहाय्यता समूह, सिंदखेड राजा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार- एकता महिला स्वयं सहाय्यता समूह, जळगाव जा.- 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

वाशिम जिल्हा
प्रथम पुरस्कार -शामकीमाता गजानन महिला स्वयं सहायता समूह,मानोरा-  10 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
व्दितीय पुरस्कार- प्रगती महिला स्वयं सहाय्यता समूह, मानोरा- 7 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र
तृतीय पुरस्कार-सुजाता महिला स्वयं सहाय्यता समूह, वाशिम - 5 हजार रुपये रोख व प्रमाणपत्र

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...