Tuesday, February 4, 2020

ग्रामपरिवर्तन अभियानातून गावांचा शाश्वत विकास साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 4 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी गावातील मुलभूत गरजा ओळखून त्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानांतर्गत झालेल्या विकास कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. खोज स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी पुर्निमा उपाध्याय यांचेसह गावचे ग्रामपरिवर्तक व इतर शासकीय यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, अभियानाच्या अनुषंगाने गावात झालेली विधायक कामे व त्याविषयीची माहिती प्राथम्याने ‘परिवेश’ पोर्टलवर अपलोड करावी. गावातील नादुरुस्त रस्त्यांची दूरुस्ती मनरेगातून करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजने अंतर्गत मंजूर लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. मेळघाटातील गावांत वीज जोडणी, पाणी पुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शाळा, अंगणवाडी आदी संदर्भातील मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. गावात पाण्याची मुबलकता राहण्यासाठी वनतलावांची निर्मिती शास्त्रोत्क पध्दतीने करण्यात यावी.
फेब्रुवारी अखेरपर्यंत अभियानांतर्गत असणाऱ्या प्रलंबित मागण्या व विकास कामे पूर्ण करण्यात यावीत. वीज चोरी रोखण्यासाठी सौर दिव्यांची उपलब्धता करुन देण्यात यावी. तसेच ग्रामस्थांचे मन परिवर्तन करुन प्रबोधन करावे. आदिवासीबहूल गावांचा विकास करण्यासाठी पाच टक्के आदिवासी उपयोजनातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. विकास कामे करतांना सर्व योजनेच्या निधीच्या अभिसरणातून कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही श्री. नवाल यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...