अचलपूर दूध संकलन-विक्री केंद्र



                                          
प्रकल्प निर्मितीसाठी निधीचे नियोजन करावे
                                                  - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 23 : अचलपूर येथे निर्माण होणाऱ्या दूध संकलन केंद्रासाठी प्रकल्प निर्मितीच्या अनुषंगाने निधीचे नियोजन करताना केंद्र सरकार, राज्य शासन व टाटा ट्रस्ट आदींकडून निधीची तरतूद करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज बैठकीत दिले.
येथील सिंचन भवन विश्रामगृहात पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय वाढ संदर्भात आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे यांच्यासह यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन द्यायावयाचे असल्यास दूध उत्पादन वाढविणे व त्यावरील खर्च कमी होणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीक्षेत्र व अपुरे सिंचन यामुळे चारा निर्मितीसाठी मर्यादा येते. अशा स्थितीत कमी पाण्यात अधिक चारा निर्मिती पर्याय शोधून शेतकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे. कमी लागवडीमध्ये पशुखाद्य निर्मितीचे उत्तम नियोजन करावे. शासनाच्या ई क्लास जमीनीवर चारा निर्मितीसाठी जमीनी ताब्यात घेऊन त्यावर चारा निर्मिती करावी. गायीचा वार्षिक खर्च किती होतो. तसेच गायीपासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी येणारा खर्च याचे शास्त्रशुध्द तक्ता तयार करण्यात यावा.
दुधाळ जनावरांना पुरेसे पशुखाद्य उपलब्ध होईल यासाठी बारा महिन्याचे पशुखाद्य व औषधीचे वेळेनुसार नियोजित आराखडा तयार करावा. सर्व ऋतूंमध्ये पशुसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने वैरण व्यवस्था भक्कम झाली पाहिजे. पशु खाद्याचे मासिक विवरणपत्र तयार करुन त्यानुसार चारानिर्मितीचे नियोजन करावे. दुधाळ पशुंना कुठल्या महिन्यात रोग अधिक बळवतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा, याची माहिती गोळा करावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यामध्ये दुग्ध उत्पादनांची वाढ प्रभावी उपाय ठरु शकते, असेही श्री. कडू यावेळी सांगितले.
सुरुवातीला चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यात दूध संकलन व विक्री केंद्र हा पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प राबवावा. दूध संकलन व विक्री केंद्राच्या उभारणीनंतर येणाऱ्या कमतरता, अडचणी तसेच फायदे-तोटे जाणून घेतल्यावर हा प्रयोग राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दूध विक्री तसेच प्रक्रिया उद्योग व दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर नफा किती मिळतो याची आकडेवारी घ्यावी. त्यानुसार शेतकऱ्यांना केंद्रात दूध विक्रीचे फायदे व तोटे आदी संदर्भात मार्गदर्शन करावे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
                                                   000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती