जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

          अचूक नियोजनासाठी रंगीत तालीम

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 : नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना लसीकरण पार पाडण्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला. लसीकरणाचे चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण होऊन सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी अचूक नियोजन करण्याच्या हेतूने ही रंगीत तालीम होती, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

            अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज सकाळी ड्राय रन घेण्यात आला.  त्यानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा रूग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पसमधल्या लसीकरण केंद्रातील सुविधांची पाहणी केली व तेथील पथकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निर्वाणे, डॉ. सतीश हुमणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, युनुस शहा, तेजस्विनी मेहरे यांच्यासह आरोग्य पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

             ड्राय रनच्या निमित्ताने लसीकरणाच्या ठिकाणी आज सकाळी सव्वाआठ वाजताच केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले होते. ड्राय रनमध्ये साधारणत: 25 व्यक्तींच्या नोंदी व तपासणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, लसीकरण अधिकारी, निरीक्षक आदी सहा व्यक्तींचे पथक उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सर्वप्रथम पथकांना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकाला सुरुवात झाली.

नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी लसीकरण केंद्राची रचना आहे. त्यानुसार प्रथम नोंदणी कक्षात प्रत्येकाच्या माहितीची नोंद झाली. कोविन ॲपच्या ट्रायल बेस्ड व्हर्जनमध्ये व्यक्तींच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार लस घेणा-या व्यक्तीला ओटीपी प्राप्त झाला. संबंधिताने नोंदणी कक्षात तो ओटीपी सांगताच इतर नोंदी व लसीकरणाचे प्रात्यक्षिक झाले. नोंदी यशस्वीपणे संबंधित यंत्रणेला पोहोचताच सर्व रुग्णांना मोबाईलवर पुढील लसीच्या तारखेची व वेळेची माहिती प्राप्त झाली. या प्रक्रियेत प्रत्यक्ष लस देण्यात आली नसली तरीही लसीकरणाच्या वेळी करावयाची आवश्यक कार्यवाहीची रंगीत तालीम लसीकरण कक्षात झाली. लस दिल्यानंतर सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवले गेले. प्रक्रियेला लागणारा वेळ तपासणे हादेखील तालमीचा हेतू होता.

 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील जवळजवळ संपूर्ण वर्ष कोरोना महामारीने ग्रासले होते. या काळात आवश्यक दक्षता, उपचार व आरोग्य सुविधांची उभारणी शासनाकडून सर्वदूर करण्यात आली. आता लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाने लसीकरणाच्या अनुषंगाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. फ्रंटलाईन वॉरिअर्सला प्रथमत: लस देण्यात येणार आहे. या सर्वांचे मनोबल वाढविणे, अचूक नियोजन व शिस्तबद्धता राखून लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ड्राय रन घेण्यात आला.

क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅपची उपयुक्तता तपासणे, लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे हा ड्रायरनचा हेतू होता. 

 

 

चार टप्प्यात लसीकरण

 

चार टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर (शासकीय आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स), दुस-या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिस-या टप्प्यात हायरिस्क व्यक्ती व 50 वर्षावरील व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेतील हेल्थ केअर वर्करचे लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात होईल. त्यानुसार सुमारे 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती