जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 











जिल्ह्यात  पल्स पोलिओ लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सुदृढ आरोग्यासाठी लसीकरणाबरोबरच उत्तम आहार महत्वाचा

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 31 : नियमित लसीकरणासह प्रसुतीआधी व बालकांच्या जन्मानंतर माता व बालकांना उत्तम आहारही मिळणे आवश्यक असते. त्यासाठी शासनातर्फे पोषण आहार योजनेसह मार्गदर्शन, जनजागृतीही करण्यात येते. माता व बालकांच्या कुटुंबियांनीही याचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आहारात नैसर्गिक भाज्या, डाळी आदी प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बाबींचा समावेश असेल याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा रुग्णालयात आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते रायन फर्नांडिस, सौरवी शिरीष किंडे, अभिषेक सोनू उईके, सागर पंकज राजनकर या बालकांना लस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.मोहिमेत शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.  लसीकरणापासून एकही बालक वंचित राहता कामा नये. त्यासाठी गृहभेटीही देण्यात येत आहेत.महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, असे निर्देश पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

बालक व मातांच्या सुदृढ आरोग्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रसूतीपूर्व व नंतरच्या काळातील एक हजार दिवसांत घ्यावयाच्या आहाराबाबत आरोग्य विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे आहार असावा. तसा आहार व दक्षता ही जीवनशैली व्हावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

लसीकरणाचे सर्व साहित्य वितरीत करण्यात आले आहे.सर्व बुथवर विहित वेळेत लसीकरण सुरू झाले. एकही बालक सुटू नये म्हणून गृहभेटी व आवश्यक तिथे प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती