भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 







कोकर्डा हयापुर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण

विविध विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 25 : उत्तम रस्ते , पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे शासनाने हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांची दर्जेदार निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, जि.प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी आमदार रमेश बुंदिले, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, सुधाकरराव भारसाकळे आदी उपस्थित होते.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात वडाळगव्हाण, कोकर्डा हयापुर या प्रमुख जिल्हा मार्गावरील पुलाचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नाबार्ड अर्थसहायित ग्रामीण पायाभूत विकास निधीतून या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलामुळे वडाळगव्हाण, उंबरी, खल्लार, हयापुर आदी परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी सुविधा झाली आहे.

आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून वलगाव- दर्यापूर- अकोट  राज्य मार्ग क्र. ४७ वर दर्यापूर ते रंभापुर फाट्याची सुधारणा या रस्त्याचे, तसेच दर्यापूर- आमला- ऋणमोचन- आसरा रस्ता प्रजिमा-२१ व रामा- ३०१ ची करण्याच्या कामाचे भूमीपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

विहित मुदतीत कामे पूर्ण करा

रस्त्यांच्या सुधारणेची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत. विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. दर्जेदार रस्ते व इतर पायाभूत सुविधा निर्माण करून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे. अपूर्ण असलेली कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन कामेही हाती घेण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती