कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

 










कृषीपंप वीज धोरणाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

                     - बच्चूभाऊ कडू यांचे आवाहन

तालुकास्तरीय क्रिडा संकुलात सर्व सुविधा निर्माण करा

 

अमरावती, दि. 29 : कृषीपंप वीज धोरण-2020 राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कृषी ग्राहकांना वीज बील थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी सवलत दिली जात आहे. वसूल होणारी सवलतीची रक्कम संबंधित ग्राम पंचायतीत विकासनिधी म्हणून जमा होऊन गावांच्या विकासाला हातभार लागू शकतो. त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे केले.

            चांदूर बाजार तहसील कार्यालयात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली क्रिडा व उर्जा विभागाचा सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, चांदूर बाजारचे तहसीलदार धिरज स्थुल, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, कार्यकारी अभियंता दिपक आघाव, उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, श्री. वानखडे यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

            श्री. कडू म्हणाले की, कृषीपंप वीज धोरण 2020 अंतर्गत कृषी ग्राहकांना, शेतकऱ्यांना सौरउर्जा अथवा उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेतून मागासवर्गीय कृषी ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीकरीता सवलत दिल्या जाते. पाच वर्षापर्यंतच्या थकबाकीवरील संपूर्ण विलंब व्याज व विलंब आकार माफ करण्यात येत असून उर्वरित रक्कम कृषी ग्राहकांच्या सोयीनुसार तीन वर्षात भरण्याची मुभा  दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून वीजबिल थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याने या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्याकडील वीजबीलाची थकबाकी चूकवावी, असेही त्यांनी सांगितले.

            कृषीपंप वीज धोरणात अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील किती शेतकऱ्यांना याचा लाभ देता येईल, याची यादी तयार करण्याचे आदेश श्री. कडू यांनी महावितरण विभागाला दिले.

            जिल्ह्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त क्रिडा संकुले निर्माण करावीत. खेळाचे मैदाने, ओपन जीम, वृक्ष लागवड आदी महत्वाच्या बाबी त्याठिकाणी तयार कराव्यात. क्रिडा विभागाला उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे यासाठी संकुलाच्या भागात दुकानांची सुनियोजित गाळे निर्माण करावे. गाळ्यांचे बांधकाम तसेच क्रिडा संकुलाच्या उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच तालुका क्रिडा समितीच्या अनुषंगाने नियोजित आराखडा तयार करुन संकुलाचे काम पूर्णत्वास न्यावे. लीज पध्दतीने दुकानांचे गाळे देतांना कालावधी, दुरुस्ती व देखभाल, नियमित भाडे, अटी व शर्ती आदी बाबींचा करारात स्पष्ट उल्लेख करावा. चांदूर बाजार व अचलपूर येथील क्रिडा संकुलाच्या परिसरातील अतिक्रमणे हटवितांना संबंधितांना पूर्व कल्पना देऊन वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश श्री कडू यांनी यावेळी दिले.

            बैठकीत अतिवृष्टीमुळे पडझड व नुकसान झालेल्या घरांच्या कुटूबांना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. गोरगरीबांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नरत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती