‘गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज’ बाबत कॅबिनेटमध्ये झाली महत्वपूर्ण चर्चा

 अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच



गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज’ बाबत कॅबिनेटमध्ये झाली महत्वपूर्ण चर्चा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

अमरावती, दि. 23 : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक चर्चा आजच्या बैठकीत झाली असून त्याबाबतच्या कार्यवाहीला वेग आला आहे. अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार म्हणजे होणारच, असा ठाम विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.  

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत यापुर्वी निवेदनही देण्यात आले होते.  महाविद्यालयाबाबत कृती समितीकडून पाठपुरावा होत आहे. कृती समितीच्या मान्यवर सदस्यांशीही पालकमंत्र्यांनी यापूर्वी चर्चा केली आहे व ही मागणी कॅबिनेटमध्येही मांडली.

 आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याची कार्यवाही गतिमान झाली आहे.   

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासन पूर्णत: सकारात्मक आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा निधी व इतर गोष्टींची पूर्तता वेगाने होण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.  आत अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच आहे. आता त्याबाबत कुणीही शंका बाळगू नये, व कसलाही संभ्रम ठेवू नये, असे ठाम प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा, अलिबाग, नंदुरबार व अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. अमरावती जिल्हा हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आहे. जिल्ह्यात मेळघाट व कुपोषणग्रस्त आदिवासीबहुल क्षेत्र बालमृत्यू व मातामृत्यूदर मोठ्या प्रमाणात आहे. अनेक उपचारांसाठी नागपूरला जावे लागते, तसेच कोरोना साथीसारख्या आजारात रुग्णसेवेसाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांची कमतरता आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्यक आहे, असे निवेदन पालकमंत्र्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासह मान्यवरांना दिले होते.

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती