जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

 




जिल्ह्यात 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

शून्य ते पाच  वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 30:  जिल्ह्यात येत्या 31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.  

           मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 व नागरी भागात 37 हजार 78 अशा 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात 1 हजार 763 व नागरी भागात 200 असे 1963 बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 830 स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असेल. 

           सर्व बालकांना 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे.  महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे. त्यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

           जिल्ह्यात विविध सार्वजनिक उपक्रम राबवून लसीकरण मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमधील प्रत्येक नवजात शिशूची माहिती गोळा करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 हजार 548 लसकुपी, 1423 लस कॅरिअर, 5 हजार 588 आईसपॅक, नोंदीसाठी आवश्यक मार्कर पेन आदी सर्व साहित्य उपलब्ध झाले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.

मान्यवरांकडून आवाहन

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर यांनी केले आहे.

नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस न चुकता जवळच्या अंगणवाडी, शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाके, सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी जाऊन द्यावा. डोस नुकतेच बाळ जन्मलेले असेल, यापूर्वी डोस दिला असेल तरीही द्यावा. बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने डोस द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती