अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शुभारंभ

 











अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शुभारंभ

जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड ठरल्या पहिल्या मानकरी

 

अमरावती, दि. 16 : कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात आज सकाळी अकराच्या दरम्यान शुभारंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यात अमरावती येथे जिल्हा रुग्णालय व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रांवर लसीकरणाचा शुभारंभ झाला. प्रत्येकी  100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांची शुभारंभाच्या दिवशी लसीकरणासाठी निवड करण्यात आली. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातीला कोविशिल्ड लसींचा सुमारे 17 हजार डोस प्राप्त झाला. त्यानंतर राज्यात सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन लसही देण्याचा निर्णय झाला. त्यात पुण्यासह अमरावती जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार कोव्हॅक्सिन लसीचे दोन हजार डोस जिल्हा  रुग्णालयाला प्राप्त झाले व तेथील केंद्रात ही लस देण्यात आली.

लसीकरणाचे उत्साहात स्वागत

 वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेचे उत्साहात स्वागत केले. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूलमधील लसीकरण केंद्रात अनेक डॉक्टर, पारिचारिका आदी वैद्यक क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण व निरामय आरोग्याच्या संदेश देणा-या रांगोळ्या केंद्रांवर रेखाटण्यात आल्या. प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी लसीकरण केंद्रांची रचना होती. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन कोविड योद्धा आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले व त्यांचे मनोबल वाढवले.  

            कोरोनाविरुद्ध जवळजवळ वर्षभर आपण लढत आहोत. लस प्राप्त होणे ही मोठी उपलब्धी आहे. फ्रंटलाईन वॉरिअर्सला प्रथमत: लस देण्यात येत आहे. ही मंडळी अहोरात्र व जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले व सर्व कोविड योद्ध्यांशी संवाद साधला.

  आरोग्य विभागाकडून लसीकरणासाठी ॲपद्वारे नोंदणी करूनच लस दिली जात आहे. यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण पूर्ण केले जाईल, असे श्री. नवाल यांनी सांगितले.  श्री. नवाल यांनी इर्विनसह पीडीएमसी व अचलपूर येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधला.

 

 

वैद्यक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत

ही लस सुरक्षित आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मी लस घेतली आहे. माझ्यासोबत पीडीएमसी येथे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, पीडीएमसीचे अधिष्ठाता व अनेक मान्यवर डॉक्टर मंडळींनी लस घेतली आहे. त्यामुळे लसीचे स्वागतच केले पाहिजे. वैद्यकक्षेत्रात सेवा बजावणारे अनेक फ्रंटलाईन वर्कर्स स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर यांनी सांगितले.

अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही यशस्वीपणे लसीकरण मोहिम राबविण्यात  आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. या केंद्रात डॉ. रणमले यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिका-यांनी लस घेतली. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही लसीकरणाबाबत स्वागत व आनंद व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती