बर्ड फ्लू प्रतिबंध उपाययोजनेसाठी तालुकानिहाय समित्या

- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 16 : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी काटेकोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुकानिहाय समित्या गठित करण्याचा आदेश जारी केला.

जिल्ह्यात अद्यापपर्यंत बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळून आली नाही. मात्र, दक्षता घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करेल. समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे,  बर्ड फ्लू संसर्गाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेणे व आवश्यकता भासल्यास बाधित क्षेत्रात कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्याची जबाबदारी ‘एसडीओंवर सोपविण्यात आली आहे.

तहसीलदार समितीचे सदस्य असतील व कामकाज समन्वय, ब्लिचिंग पावडर, प्लास्टिक बॅग आदी साहित्य पुरवठ्याची व आवश्यकता भासल्यास मृत कुक्कुट पक्ष्यांचे तलाठी, ग्रामसेवक व पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत स्थळ पंचनामा करुन घेण्याची त्यांची जबाबदारी असेल.

तालुका आरोग्य अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. दैनंदिन अहवाल देणे, रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांकडून करून घेणे, आवश्यकता असल्यास पीपीई कीट पुरविणे, आवश्यक औषध साठा देणे, मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी साहित्य पुरविण्याची त्यांची जबाबदारी असेल.  पोलीस निरीक्षक हे सदस्य असून, त्यांना प्रतिबंधित क्षेत्रात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी नेमणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे. पशुधन विस्तार अधिकारी (विस्तार) यांच्याकडे प्रभावी जनजागृती व संबंधित बाजारावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी आहे.

 जलसंपदा उपअभियंता व क्षेत्रीय वनाधिकारी या सदस्यांवर स्थलांतरित पक्षी, वन्य पक्षी आदींद्वारे बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाशी समन्वय ठेवून उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

           पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे. अद्ययावत माहिती व शंकानिरसनासाठी 18002330418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती