पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

 







पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा

पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक गावांना पिण्याचे पाणी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

जिल्ह्याचे उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करा

1588 गावांसाठी 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी

 

               अमरावती, दि. 31 : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरळीत नियोजन करुन पाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचाईचा प्रश्न सोडविता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

           जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत गावांत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. कोपूलवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. सावळकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून केंद्र शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे राज्यांना कळविले आहे. राज्य शासनानेही हे मिशन राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एकूण 3 लाख 10 हजार 656 कार्यात्मक नळजोडणी झालेल्या आहेत. उर्वरित 1 लाख 45 हजार 968 कार्यात्मक नळजोडणी करणे अपेक्षीत असून त्यासाठी सुनियोजित उपाययोजना आखून पाणी पुरवठा योजना निहाय सदर गावांना नियमितपणे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जल जीवन मिशन हा कालबध्द कार्यक्रम असल्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये व त्याअनुषंगाने निर्गमित शासन निर्णयानुसार राज्यात जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाव्दारे गावांना पाणी पुरवठा होण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ठ विहित मुदतीत साध्य करण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात यावा. मेळघाटसह इतर तालुक्यातील गावांना सुरळीत पाणी पुरवठा होईल यासाठी अचूक नियोजन करुन कामे पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिल्यावर योजना पूर्ण करण्यास अनुक्रमे जास्तीत जास्त 18 महिने 36 महिन्यांचा कालावधी दिला आहे. मिशन अंतर्गत ब यादीमधील समाविष्ट ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास तीन वर्षाचा अवधी लागतो अशा योजनांचा कार्यारंभ आदेश कोणत्याही परिस्थितीत मार्च 2021 पूर्वी देण्यात यावा. तर क यादीत समाविष्ट ज्या नवीन योजना पूर्ण करण्यास दोन वर्षाचा कालावधी लागतो अशांचा कार्यारंभ आदेश मार्च 2022 पूर्वी देण्यात यावेत. मार्च 2022 नंतर कार्यारंभ आदेश देता येणार नाही. जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात 19 गाव पाणी पुरवठा योजना, अचलपूर व चांदूरबाजरसाठी 24 गाव, चांदूरबाजार, अमरावती, भातकुली, अचलपूर 105 गाव, अमरावती नांदगाव पेठसाठी 33 गाव, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर साठी 144 गाव, चिखलदरा तालुक्यात गौरखेडा बाजार 35गाव, शहापूर 3 गाव, मोर्शी तालुक्यात 70 गाव पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण केल्या जाणार आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. सावळकर यांनी बैठकीत सांगितले.

 

यावेळी बैठकीत टाकरखेडा शंभू येथील वीज पडून व पुरात वाहून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी अपघाती निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची आस्थेवाईपणे विचारपूस केली.

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती