संयुक्त आराखड्यातून शेंडगावसह विविध ठिकाणांचाही विकास निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 












कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जन्मभूमी विकास आराखडा

संयुक्त आराखड्यातून शेंडगावसह विविध ठिकाणांचाही विकास निधी कमी पडू देणार नाही

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 24 : श्री संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेंडगावबरोबरच त्यांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव अमरावती येथेही संयुक्त आराखड्यातून विकासकामे पूर्ण केले जातील. निधीची कमतरता पडू देणार नाही,असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज शेंडगाव येथे केले.

श्री संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, जि.प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी आमदार रमेश बुंदिले, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, सुधाकरराव भारसाकळे, गाडगेबाबा मिशनचे मधुसूदन मोहिते पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

विकास आराखड्यात 18.63 कोटी निधीतून धर्मशाळा बांधकाम, श्री संत गाडगेबाबा स्मृती भवन, बहुउद्देशीय सभागृह, न्याहारी भवन, आर्ट गॅलरी, ग्राम सफाई अभियान प्रशिक्षण केंद्र, विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, घाटाचे बांधकाम, प्रसाधनगृह आदी कामांचा समावेश आहे. 10 महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, विकास आराखड्यात नियोजित कामांसह  इतरही आवश्यक कामांचा समावेश केला जाईल. संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमी असलेल्या सर्व गावांचा संयुक्त आराखड्यातून विकास करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही. संत गाडगेबाबा यांनी मानवतावादाची शिकवण दिली व अंधश्रद्धा नाकारल्या. ते थोर कर्मयोगी होते. त्यामुळे आपणही बाबांची खरी शिकवण अंगिकारली पाहिजे व पूजा अर्चा आदी टाळून कृतीवर भर दिला पाहिजे. संत गाडगेबाबा मिशनमध्ये सदस्यपद मिळणे हा आपल्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

संत गाडगेबाबा जन्मभूमी विकासासाठी केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे खासदार श्रीमती राणा सांगितले.विकास आराखड्यात घाट, कोल्हापुरी बंधारा आदींच्या समावेशामुळे जलसंधारणही साध्य होणार असल्याचे आमदार श्री. वानखडे यांनी सांगितले.शासनाकडून पूर्वी मंजूर  आराखड्यानुसार आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला व कामांना गती दिल्याचे श्री. पोटे पाटील यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची भाषणे यावेळी झाली. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती