ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योगासह विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे - ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

                                            



                                         






स्वच्छ दुग्धोत्पादन तंत्र तथा दुग्ध पदार्थ निर्मिती प्रशिक्षण वर्गाचे व

माळी प्रशिक्षण केंद्राचे राज्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

 

ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योगासह विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे

 

                                    -ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 23 : ग्रामीण क्षेत्राचा शाश्वत विकास होण्यासाठी ग्रामस्तरावर कौशल्ययुक्त प्रक्रिया उद्योगाची उभारणी आवश्यक आहे. गावात निर्माण होणाऱ्या दुग्ध उत्पादनांवर त्याचठिकाणी प्रक्रिया करुन बाजारातील मागणीनुसार उच्चतम कृषीमालाचे अखंडीत पुरवठा केला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते. या उत्पादनांना विपणन व्यस्थेची जोड देऊन ‘विकेल ते पिकेल’ या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायाची वाटचाल आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विस्तार शिक्षण संचालनालय, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग तथा कृषी संशोधन केंद्र, अचलपूर याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "स्वच्छ दुग्धत्पादन तंत्र तथा दुग्धपदार्थ निर्मिती" विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे तथा विद्यापीठांतर्गत 'माळी प्रशिक्षण केंद्राचे" उद्घाटन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, निम्न कृषी शिक्षणचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बी. व्ही. सावजी, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण, कृषी संशोधन केंद्र, अचलपूरचे प्रभारी अधिकारी डॉ. योगेश चर्जन, विस्तार शिक्षण संचालनालयाचे प्राध्यापक डॉ. प्रमोद वाकळे, अमरावती विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे,  कृषी विज्ञान केंद्र घातखेडचे विषय तज्ञ पशुसंवर्धन डॉ.शरद कठाळे आदी यावेळी उपस्थित होते.  

            श्री. कडू म्हणाले की, गाव पातळीवर कृषीमाल प्रक्रिया केंद्रांची उभारणी करणे आवश्यक आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या मार्गदर्शन केंद्राचा व येथील संसाधनाचा उपयोग घेऊन दुग्धोत्पादन क्षेत्रात विकासात्मक पाऊलवाट करावी. अचलपूर तालुक्यातील व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी व पशुपालकांसाठी अचलपूर येथे सर्व सुविधायुक्त दूध संकलन केंद्र निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्रावर दूध संकलीत केल्या जाईल. जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना दूध जास्त काळ टिकविण्यासाठीचे प्रशिक्षण तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण या केंद्रातून दिल्या जाणार आहे. दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी आवश्यक ती बाजारपेठ सुध्दा उपलब्ध केल्या जाईल. पॅकेजिंग पध्दती व उत्तम गुणकारी दूध उत्पादनासाठी पशुंना खाद्य, चारा आदी संदर्भात सुध्दा या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांतर्गत अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्राचे बळकटीकरण व सक्षमीकरण करणे गरजेचे असून उद्यानविद्या विषयक तथा उद्योजकता विषयक "सेंटर फॉर एक्सलन्स" उभारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या काळात अचलपूर येथे सर्व सुविधायुक्त प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.  या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अचलपूर परिसरात दुग्ध व्यवसायाचे बळकटीकरण मार्गदर्शन, दुग्ध पदार्थ निर्मिती प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी राबवून उच्चप्रतीचे दुग्ध पदार्थ निर्मितीचे तंत्रा संदर्भात शेतकरी, दुध उत्पादकांना अवगत केल्या जाईल. याचा तालुक्याला येथील परिसराला व्यावसायिक फायदा होईल, असे विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य डॉ. अर्चना बारब्दे यांनी कार्यक्रमात सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात कृषीक्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन तथा दीपप्रज्वलनाने झाली. प्रशिक्षण वर्गाचे आयोजनामागील भूमिका विशद करताना संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्व विषद करीत ग्राम विकासासाठी कृषिपूरक व्यवसायांचे सक्षमीकरण कालसुसंगत असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन कृषी संशोधन केंद्र, अचलपूरचे प्रभारी अधिकारी डॉ. योगेश चर्जन यांनी केले.

उद्घाटनानंतर तांत्रिक सत्रात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजेश्‍वर शेळके यांनी "स्वच्छ दूध उत्पादन तथा दुग्धपदार्थ निर्मिती तंत्रज्ञान" विषयक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उपायुक्त पशुसंवर्धन अमरावती डॉ.मोहन गोहत्रे तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,अचलपुर डॉ. विजय राहटे, मदर डेरी उद्योगाच्या कन्सल्टंट श्रीमती मेश्राम व कृषी विज्ञान केंद्र घातखेडचे विषयतज्ञ डॉ.शरद कठाळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकयुक्त प्रशिक्षण वर्गात उपस्थित महिला वर्गाने विविध दुग्ध पदार्थ स्वतः बनवीत कौशल्य विकासाचे धडे दिले.

याप्रसंगी उपस्थितांनी खवा, चक्का, पनीर, कुल्फी आईस्क्रीम तसेच पेढा, बर्फी, श्रीखंड व्यावसायिक पद्धतीने बनवण्याच्या कृतीयुक्त पद्धती प्रत्यक्ष गिरवीत सहभागाचे समाधान मिळविले. प्रात्यक्षिके आयोजनासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ.शेषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डॉ.राजेश्‍वर शेळके, डॉ.संजय शेगोकार, डॉ.संजीवकुमार नागे, रवी पवार आदींनी सहकार्य केले. तर एकंदरीत प्रशिक्षण वर्गाचे आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालनालयाचे डॉ.नागनाथ जंगवाड, प्रा.संजीवकुमार सलामे, डॉ.सुहास मोरे  यांचेसह कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे प्रभारी अधिकारी डॉ. योगेश चर्जन,डॉ.राजेंद्र वानखेडे, कु.सोनल नागे, अतुल लव्हाळे, श्री कराळे, श्री गाडेकर व कुमारी सावळे यांनी अथक परिश्रम घेतले.

00000    
--   

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती