मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पाळावे : जिल्हाधिकारी

 






ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान

मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पाळावे : जिल्हाधिकारी

 

अमरावती, दि. 14 : जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींच्या 4 हजार 397 सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी उद्या (15 जानेवारी) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून, जिल्ह्यात यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. मतमोजणी सोमवारी (18 जानेवारी) होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. कोरोनाची साथ लक्षात घेऊन प्रत्येक मतदाराने मास्कचा वापर करून निवडणूक कामकाजासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.   

सर्व तालुका ठिकाणांहून मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी पथके रवाना झाली व सायंकाळपूर्वी मतदान केंद्रांवर पोहोचली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांचे व साहित्याचे सॅनिटायझेशन करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी जागेची पुरेशी रचना व आरोग्य पथकांची उपस्थिती आदी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन देऊन मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी मतदानासाठी बोलावण्यात येईल. त्याचप्रमाणे, कोरोनाबाधितांनाही अखेरच्या अर्धा तासात मतदान करता येईल. त्यासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही केंद्रांवर असेल. 

477 जागा यापूर्वीच बिनविरोध

जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतींत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही. त्यामुळे एकूण 477 जागा बिनविरोध झाल्या आहेत. या बिनविरोध जागांचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. उर्वरित 537 ग्रामपंचायतीच्या 4 हजार 397 सदस्य पदांसाठी निवडणूक होईल.

127 संवेदनशील केंद्र

या निवडणूकीसाठी 1948 मतदान केंद्रे असून, त्यात 127 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. पाच लाख सहा हजार 804 महिला, पाच लाख 33 हजार 344 पुरूष व  इतर नऊ असे एकूण 10 लाख 40 हजार 159  मतदार आहेत. निवडणूकीसाठी  2 हजार 177 मतदान केंद्राध्यक्ष, 6 हजार 745 मतदान कर्मचारी व 2 हजार 78 शिपाई असे सुमारे 11 हजार मनुष्यबळ तैनात आहे. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती