Monday, June 28, 2021

बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर













                                         'उडान' उपक्रमात कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ

बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण उपक्रम

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 28 :  'उडान' उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून,  त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.

          अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख,  महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

          कारागृहात बंदीजनांतील कारागीर, कलावंताच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून अनेकविध सुंदर वस्तू व कलाकृतींची निर्मिती होते.  या वस्तूंच्या विक्रीसाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्जनशीलतेला वाव देऊन सकारात्मकता पेरणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          नाविन्यपूर्ण योजनेत सुमारे 50 लाख निधीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. तिथे बंदीजनांनी निर्माण केलेल्या अनेकविध वस्तू

विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

00000


बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

                                    

               







     शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. २८ : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे  प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

          कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, वि. प. स. किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी  सहसंचालक शंकर तोटेवार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया असे अनेक योजना- उपक्रम गटांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ शेतकरी व महिला गटांना मिळवून द्यावा. त्यासाठी योजनेची माहिती, तांत्रिक बाबी याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण, प्रचार- प्रसार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यशाळा आदींचे आयोजन नियमित करावे. योजनेचा शेवटच्या माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री. पोटे पाटील, श्री. सरनाईक आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००


महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

                                             








                            महिला व बालविकास भवनाचे भूमिपूजन

महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 28 : महिला व बालविकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

          येथील गर्ल्स हायस्कुल परिसरात महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

          महिला व बालविकास उपायुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, राज्य महिला आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी कार्यालये या भवनात एकाच छताखाली असतील. या भवनासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

          महिला आयोगाचे कार्यालय विभागीय स्तरावर सुरू करण्यात आले. ते कार्यालय देखील या इमारतीत असेल. महिला व बालविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजनात तीन टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कामांना चालना देण्यात येत असल्याचे मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

          नागरी भागातही कुपोषणाची समस्या आहे. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लोकप्रतिनिधी व विविध स्तरातील मान्यवर, नागरिकांनीही कुपोषित मुलांच्या संगोपनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 

          महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी प्रास्ताविक केले.

00000




'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 








'सायन्सकोर'वर तारांगण

'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 28  : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केले.

          सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

          माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

सायन्सकोरवर तारांगण

          सायंटिफिक पार्कमध्ये प्लॅनेटोरियमची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तारांगणाची शास्त्रीय माहितीसह अनुभूती अमरावतीकरांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, विज्ञानविषयक प्रदर्शनाचाही पार्कमध्ये समावेश आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून हा सुंदर प्रकल्प उभा राहणार आहे.

विहित मुदतीत काम पूर्ण करा

          सायंटिफिक पार्कच्या रूपाने एक महत्वाचा प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारत आहे. त्याची नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकामंत्र्यांनी यावेळी दिले.

          सायन्सकोर मैदानावर संरक्षण व सौंदर्यीकरण अंतर्गत १ कोटी ५२ लाख रुपये निधीतून मैदानाचे गेट, कुंपण भिंत, ४०० मीटर पेव्हिंग व जॉगिंग ट्रॅक बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी वृक्षारोपण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली व  खेळाडू, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

          ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. त्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.

00000

 

निवडणूक यंत्रणेचा उपक्रम 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 







निवडणूक यंत्रणेचा उपक्रम

'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट' यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

          अमरावती, दि. 28 : निवडणुकीतील महत्वपूर्ण साधने असलेल्या 'ईव्हीएम' व 'व्हीव्हीपॅट" यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.

 माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख,  महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.

           सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे.

अशी असेल रचना

           गोदाम इमारतीची तळमजला व पहिला मजला अशी रचना असेल. एक हजार 926 चौरस मीटर जागेत तळमजल्यावर 6 मतमोजणी कक्ष असतील. मतदान यंत्रणेसाठी  सुरक्षा कक्ष असेल. दर्शनी भागात आवक जावक कक्ष, स्वच्छतागृह आदी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर कार्यालय असेल. त्याशिवाय, सुरक्षेसाठी मजबूत आवारभिंती, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था आदी बाबी असतील.

          यंत्रणेची सुस्थिती व सुरक्षितता राखण्यासाठी हे गोदाम उपयुक्त ठरणार आहे.

00000

आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 






आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 28 : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. त्यासाठी 'मेळघाट हाट'ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. 

          पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी 'मेळघाट हाट' प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी उपस्थित होते. 'माविम'चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटात स्थानिक महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले. या भगिनींकडून अनेक उत्कृष्ट उत्पादने निर्माण होतात. त्यात विविधता आणणे, या नैसर्गिक उत्पादनांची वैशिष्ट्ये जगापुढे आणणे व विपणनाचे जाळे भक्कम करणे यासाठी 'मेळघाट हाट'चा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल.

संशोधन करा, नव्या संकल्पना राबवा

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, मेळघाटचा ब्रँड जगभर पोहोचण्यासाठी विपणन पद्धतीचे अधिकाधिक संशोधन करून, अभिनव संकल्पना राबवल्या पाहिजेत.

          मेळघाट महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात विभागला गेला आहे. मध्यप्रदेशातील उत्पादने, वैशिष्ट्ये, स्वरूप यांचाही विचार प्रकल्पात व्हावा. मेळघाटच्या पारंपरिक उत्पादनांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

          गटांच्या सदस्यांना आर्थिक बाबींचे प्रशिक्षण मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

मेळघाटात आहेत २५ हजार महिला गट सदस्य

          मेळघाटात 'एमएसआरएलएम' व 'माविम'कडून २ हजार ३५९ महिला स्वयंसहायता गट असून, २५ हजारहुन महिला सदस्य सहभागी आहेत. 

 

 

आधुनिक विक्री केंद्र

          उपक्रमात अमरावती शहरात मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक विक्री केंद्र, माल साठवणुकीसाठी गोदाम, वाहतूक व्यवस्था, हरिसाल, धारणी, सेमाडोह व चिखलदरा येथे उत्पादने व संकलन केंद्रे असतील.

मॉलचे संचालन संपूर्णतया महिलांद्वारे

          मॉलचे संचालन संपूर्णतया महिलांद्वारे करण्यात येईल. विविध गृहोपयोगी, हस्तनिर्मित कला वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य, सेंद्रिय ताजा भाजीपाला, फळे, वनौषधी आदी उपलब्ध असेल. 'महिला बचत गट आपल्या दारी' उपक्रमात घरपोच सेवेबरोबर ऑनलाईन विक्रीही होणार आहे.

याबाबत विक्री केंद्राच्या संकल्पचित्राचे सादरीकरणही करण्यात आले.

00000

 

Sunday, June 27, 2021

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर














नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य

ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण

      - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

 

बेनोडा (शहीद) आरोग्य केंद्र व मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे

पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 

वणी ममदापूर येथील ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

              अमरावती, दि. २७: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन  प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गोर-गरीब रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाईल. याअंतर्गत ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य दिल्या जाईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे सांगितले.

 

           वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑक्सीजन प्लाँटचे भूमीपुजन तसेच मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, जि. प. सदस्य राजाभाऊ बोरकर, वरुड प. स. सभापती विक्रम ठाकरे, निनाताई गव्हाड, सरपंच श्रीमती कुबडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक श्री. पोतदार, डॉ. अमोल देशमुख, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी यावेळी उपस्थित होते.

 

            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची संभावना वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाने भर दिला आहे. आपली लढाई ही कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूशी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणीही गाफील न राहता कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता तर डेल्टा प्लस नावाचा विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. राज्यात ह्या विषाणूचे संक्रमन झालेले 50 रुग्ण आहेत. मागील कालावधीत कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी आपल्या आप्त स्वकीयांना गमावले आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता कोरोना त्रीसूत्रीचे काटेकोर पालन करावे. सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. शासनाकडून लावलेल्या कोरोना निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

 

         त्या पुढे म्हणाल्या की, भागात आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर आघाडी शासन भर देत आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. याठिकाणी उपचार यंत्रणा सुसज्ज करण्यासह ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन प्लाँटची निर्मिती केल्या जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी शासन व आरोग्य विभागाकडून सर्व उपाययोजनांची तजवीज करण्यात येत आहे. ग्रामीण रुणालय यंत्रणा बळकट करण्यासाठी वरुड उपजिल्हा रुग्णालयाला अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढेही वरुड तालुक्यासाठी नवीन रक्त पेढी आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येणार. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद केल्या जाईल, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

बेनोडा (शहीद) येथे ऑक्सिजन प्लांट

 

बेनोडा शहीद येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून दरदिवशी 44 ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे. या आरोग्य केंद्रात 17 एप्रिलपासून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून 50 ऑक्सिजन बेडसची सुविधा करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे शंभर कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्रात उपचार करण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिक्षक श्री. पोतदार यांनी दिली.

 

            यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनीही सामायिक भाषन केले.  वरुड तालुक्यात नवीन रक्तपेढी निर्माण करण्यासाठी निधी, प्रस्तावित चार प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना केली.

 

 वणी ममदापूर येथील ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

        तिवसा तालुक्यातील वनी ममदापूर ग्रामपंचायत भवनचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. वनी ममदापूर येथील 9 लक्ष रुपयाच्या तांडा वस्तीच्या रस्ता बांधकामाचे पालकमंत्र्यांचे हस्ते भुमिपूजन, ग्राम पंचायतच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ओपन जीमचे सुध्दा लोकापर्ण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. गावात रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पांदण रस्ते आदी नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले.

 

0000

 


DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...