छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य जगासाठी आदर्श - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर








सह्याद्रीचा सिंह गर्जतो
, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

#शिवस्वराज्य दिन

महाराष्ट्रगीताच्या मंगल सुरांनी निनादले आसमंत

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन

छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य जगासाठी आदर्श

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती,दि. ६ :-युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येऊन नमन करण्यात आले.

              महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा सर्वात मंगलमय दिवस आहे, असे सांगून त्यानिमित्त पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          ६ जून १६७४ या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि राजे 'छत्रपती' झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. आजपासून दरवर्षी ६ जून   हा दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी 350 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी यावेळी केले.

शिवरायांनी कृषी विकास, जलसिंचन, पर्यावरण संवर्धन, लोककल्याणकारी प्रशासन, उद्यमशीलता अशा विविध बाबतीत विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला. महाराजांनी जलसंवर्धन, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून एक खऱ्या अर्थाने आधुनिक राज्य स्थापन केले. या मंगलमय दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात स्वराज्यगुढी पूजनाबरोबरच यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्याच्या मंगल सुरांनी आसमंत निनादून गेले होते.

 

00000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती