Monday, June 7, 2021

अंगणवाडी सुधारणांसह विविध उपक्रम राबवा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





जिल्हा नियोजन निधीत महिला व बालविकास योजनांसाठी तीन टक्के राखीव निधी

अंगणवाडी सुधारणांसह विविध उपक्रम राबवा

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 7 : जिल्हा नियोजन निधीत महिला व बालविकास योजनांसाठी तीन टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून अंगणवाडी सुधारणांसह विविध उपक्रमांना चालना देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भंडागे, राजश्री कोलखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिला व बालविकासाच्या विविध योजनांना चालना मिळण्यासाठी जिल्हा नियोजनातील 3 टक्के निधीची तरतूद करण्यात आली.  त्यानुसार यंदाच्या 300 कोटींच्या जिल्हा नियोजनात 9 कोटी रुपये निधी राखीव राहील. त्यानुसार अंगणवाडी इमारत सुधारणा, सुशोभीकरण, कुंपण भिंती आदी कामांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. अंगणवाड्यांना पेयजल सुविधा, स्वच्छतालये, इतर आवश्यक उपकरणे, ई-लर्निंग सुविधा आदींबाबत विभागाने परिपूर्ण नियोजन करुन त्यानुसार कामे राबवावीत. महिला व बालविकास भवन उभारण्यासाठीची निविदा आदी प्रक्रिया गतीने राबवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

                                    अंगणवाड्यांत सौरऊर्जा दिवा प्रणाली

 

राखीव निधीबरोबरच इतर कार्यक्रमांतून अंगणवाडीत सुविधा करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 595 अंगणवाड्यांमध्ये सौर घरगुती दिवा प्रणाली आस्थापित व कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमाला यापूर्वीच मंजूरी देण्यात आली आहे. इमारतींच्या सुरक्षिततेसाठी कुंपण आदी सुविधाही उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात वर्किंग वुमेन होस्टेल व इतरही बाबींसाठी निधी देऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...