पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

प्रत्येक तालुक्यात रोपवाटिकेचे उद्दिष्ट पूर्ण करावे

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            अमरावती, दि. 01  : भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना रोपवाटिकेसाठी  फ्लॅट टाईप शेडनेट,  प्लास्टिक टनेल निर्मितीसह इतर साधनसामग्री अनुदान तत्वावर दिली जाते. प्रत्येक तालुक्यात रोपवाटिका निर्माण व्हावी, तसेच लक्ष्यांक पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

              शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी व उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मुख्य पीकांबरोबरच भाजीपाला उत्पादन व इतर पूरक उद्योगांनाही चालना देण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेत शेतकऱ्यांना भाजीपाला रोपवाटिका निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन अश्या एकूण 18 रोपवाटिकांचे उद्दिष्ट आहे. तथापि, काही तालुक्यांचा लक्ष्यांक पूर्ण झालेला नाही. त्यामुळे याबाबत तालुका कृषी अधिका-यांमार्फत शेतकरी बांधवांना योजनेची माहिती देऊन अर्ज करण्यास प्रोत्साहन द्यावे. मुख्य पीकांबरोबरच भाजीपाला उत्पादनामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले.

 

              योजनेबाबत सांगताना जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे म्हणाले की, या योजनेत प्रत्येक तालुक्यात एक रोपवाटिकेची उभारणी करावयाची आहे. त्यानुसार अमरावती, मोर्शी, अचलपूर या तालुक्यांना सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक प्रमाणे रोपवाटिकेचे वितरण करण्यात आले आहे. भातकुली, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, वरूड, चांदुर बाजार या तालुक्यातून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गाचे लक्षांक शिल्लक आहे. तसेच अमरावती, अचलपूर, मोर्शी या तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रत्येकी एक प्रमाणे लक्षांक शिल्लक आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिका-यांमार्फत जनजागृती होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

योजनेत सहभागी होण्यासाठी निवड व प्राधान्यक्रम :

 

                  योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक  आहे. रोपवाटिका उभारणीसाठी त्याठिकाणी पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. योजनेत महिला कृषी पदवीधारकांना प्रथम, महिला गट किंवा महिला शेतकरी यांना व्दितीय तर भाजीपाला उत्पादक, अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.

 

 

योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष :

 

           योजनेअंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. या घटकासाठी यापुर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटिकाधारक, शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका तसेच राकृवियो योजना एमआयडीएच, पोकरा किंवा इतर योजनातून संरक्षित शेती घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी यांना लाभ मिळणार नाही.

 

               टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आदी घटक समाविष्‍ट असून यासाठी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात    3.25 मीटर उंचीचे फ्लॅट टाईप शेडनेट गृहासाठी 1 हजार चौ.मी. क्षेत्रफळ, 380 रुपये प्रति चौ.मी. मापदंड रुपयानुसार 3 लाख 80 हजाराच्या प्रकल्प खर्चासाठी 1 लाख 90 हजार अनुदान रक्कम मिळेल.  प्लास्टीक टनेल निर्मितीसाठी 1 हजार चौ.मी. क्षेत्रफळ, 60 प्रती चौ.मी. मापदंड रुपयानुसार 60 हजार प्रकल्प खर्चासाठी 30 हजार रुपये अनुदान मिळेल. ही बाब ऐच्छीक स्वरुपाची आहे.  पॉवर नॅपसॅक स्प्रेअर करीता  7 हजार 600 रुपयाच्या खर्चास अर्धे किंमतीचे अनुदान राहील.  62 प्लास्टीक क्रेटस् साठी 200 रुपयेप्रमाणे  12 हजार 400 रुपयाच्या खर्चास अर्धे अनुदान मिळेल.

 

                अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती