नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून अमरावती तालुक्यातील विकासकामांचा आढावा नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. २० : नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज यावली येथे केले. पालकमंत्र्यांनी आज यावली शहीद येथील पुलाची व कोविड हॉस्पिटलची पाहणी केली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा, समाज मंदिर व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. कोरोना संकटकाळामुळे काही कामांत अडथळे आले तरी त्यावर मात करून या कामांना चालना देण्यात येत आहे. कोरोना संकटकाळातही प्रत्येक अडचण दूर करून विकासाची गती वाढविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वदूर प्रयत्न होत आहेत. या काळात रोजगाराची निर्मिती करण्याची गरज लक्षात घेऊन प्राधान्याने मनरेगातून पायाभूत सुविधांची कामे राबविण्यात आली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यात जलसंधारण, रस्ते आदी अनेक कामांना चालना देण्यात आली. त्यातून मोठी रोजगारनिर्मिती झाली. या कामांत अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर राहिला, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री यांनी भगवानपूर येथे सदिच्छा भेट देऊन गावकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्री यांनी रस्त्यात चटईवर बसून ग्रामस्थांच्या समस्या, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. पालकमंत्र्यांच्या या अगदी साध्यापणाच्या कृतीमुळे सर्वजणांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक इमारतींची कामेही पूर्णत्वास जाण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनानेही या कामांना गती द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावली येथील कोविड सेन्टरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या गावांना वेळेत निधी मिळून कामांना चालना मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. विकास कामांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावी. कामांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी माहिती सादर करावी. नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती