Monday, June 7, 2021

ऑटोरिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ

 



ऑटोरिक्षाचालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान

 पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ

 

अमरावती, दि. ७ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा परवानाधारकांना दीड हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. कोरोनाकाळातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दुर्बल घटकांना विविध प्रकारचे सहाय्य करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतही पात्र परवानाधारकांनी अर्ज करुन सानुग्रह अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

सानुग्रह अनुदान वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑटोरिक्षाचालक अनिल कदम, मो. एजाज नासिर व प्रशांत खांडे यांना शुभारंभप्रसंगी अनुदान वितरीत करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविडकाळात विविध क्षेत्रांपुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्या दूर करण्यासाठी विविध योजना- उपक्रमांची अंमलबजावणी शासनाकडून होत आहे. ज्या ऑटोरिक्षाचालकांनी अद्यापही सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केले नाहीत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत. प्रशासनाने ही प्रक्रिया गतीने राबवावी व कुणी वंचित राहू नये यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

रिक्षाचालक बांधवांना परिपूर्ण माहिती देऊन व्यवस्थित अर्ज भरून घ्यावेत जेणेकरून त्रुटी राहता कामा नये. या उपक्रमाची माहिती सर्वदूर पोहोचवावी व अधिकाधिक चालकांना अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

            अमरावती विभागात एकूण 13 हजार 208 रिक्षा नोंदणीकृत आहेत. अमरावती जिल्ह्यात 5 हजार 815 रिक्षा, बुलडाणा जिल्ह्यात 925 रिक्षा, यवतमाळ जिल्ह्यात 1123, तर अकोला जिल्ह्यात 4 हजार 443 रिक्षा व वाशिम जिल्ह्यात 902 रिक्षा नोंदणीकृत आहेत.  त्यापैकी अमरावती जिल्ह्यात 2189, बुलडाणा जिल्ह्यात 619, यवतमाळ जिल्ह्यात 559, अकोला जिल्ह्यात 2703, वाशिम जिल्ह्यात 143 असे एकूण 6 हजार 213 अर्ज प्राप्त आहेत. अमरावती विभागातील 4 हजार 193 अर्ज मंजूर करण्यात आले असून, उर्वरित अर्जांबाबतही प्रक्रिया होत आहे.  अमरावती जिल्ह्यात 1 हजार 379 अर्ज अद्यापपर्यंत मंजूर असून, उर्वरितबाबत प्रक्रिया होत असल्याचे परिवहन अधिका-यांनी सांगितले.

 

सर्व ऑटोरिक्षा परवानाधारक या योजनेत पात्र असून, वाहन क्रमांक, वाहन परवाना, परमिट व आधार क्रमांक आदी माहिती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळवता येतो.  https://mahatransport.net/ वर अर्ज करण्याचे आवाहन परिवहनचे कर वसुली अधिकारी विजय गावंडे यांनी केले.

   00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...