Friday, June 4, 2021

एसआरपीएफ महिला बचत गटांच्या उत्पादनांना ‘माविम’चे व्यासपीठ मिळवून देऊ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 










महिला बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

एसआरपीएफ महिला बचत गटांच्या उत्पादनांना ‘माविमचे व्यासपीठ मिळवून देऊ

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. ४ : राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या कुटुंबातील महिलांच्या बचतगटाव्दारे मशरुम शेती, मधुमक्षिका पालनातून मधनिर्मिती, कमळाची शेती आदी स्वयंरोजगार निर्माण होणारे उपक्रम राबविण्यात येत असून, विविध उत्पादने निर्माण केली जात आहेत. हा उपक्रम वाखाणण्यासारखा असून या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ‘उडान व महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यासपीठ मिळवून दिले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

           राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९  येथे महिला बचत गटाव्दारे उत्पादित वस्तुंच्या प्रदर्शनाचा शुभारंभ  पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. गटाचे समादेशक हर्ष पोद्दार, श्रीमती पोद्दार, आकांक्षा ठाकूर, पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे यांच्यासह गटातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व जवान, बचतगटाच्या महिला आदी यावेळी उपस्थित होते.

           श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एसआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी, जनतेच्या सुरक्षेकरिता अनेक दिवस कुटूंबापासून दूर राहून देशसेवा करीत असतात. त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुरक्षित वातावरणात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने एसआरपीएफ गटाव्दारे महिलांचे बचतगट निर्मिती करण्यात आली आहे. बचतगटाच्या माध्यमातून विविध मशरुम, नैसर्गिक मध, कमळाची फुले आदी उत्पादने निर्माण केली जात आहेत.  या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी उडान व माविम उपक्रमांत त्यांचा समावेश करू. यासाठी ‘एसआरपीएफने  प्रस्ताव सादर करावा. आवश्यक मान्यता व गरज पडल्यास निधीची तरतूद करू, असेही त्यांनी सांगितले.

               समादेशक श्री. पोद्दार म्हणाले की, राज्यात किंवा जिल्ह्यात कुठेही संकट उद्भवले तर आपत्ती निवारणासाठी राज्य राखीव दलाला त्याठिकाणी पाचारण केले जाऊन बंदोबस्त केला जातो. देशसेवा किंवा कर्तव्य बजावत असताना अनेक दिवस, महिने जवानांना त्याच ठिकाणी कुटूंबापासून दूर रहावे लागते. अशा काळात त्यांच्या कुटूंबाला सुरक्षित वाटावे त्यांना घरगुती वातावरण मिळावे यासाठी गटाव्दारे विविध उपक्रम राबविले जातात.  महिला बचतगटांची स्थापना करुन गटाच्या सदस्यांना शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. सुमारे 40 महिला बचत गटांची निर्मिती करुन त्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी गटाव्दारे मदत करण्यात येते.  ई कॉमर्सच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री सुध्दा केली जात आहे. या माध्यमातून बचतगटांना आर्थिक स्थैर मिळवून दिल्या जात आहे. खेळीमेळीच्या अगदी कौटुंबिक वातावरणात उत्पादनांची निर्मिती होत असल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत, असे श्री. पोद्दार यांनी यावेळी सांगितले.

              यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनात ठेवण्यात उत्पादनांची माहिती व उपयुक्तता जाणून घेतली. प्रारंभी पालकमंत्र्यांना एसआरपीएफ गटाव्दारे मानवंदना देण्यात आली. 

 

                 0000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...