आता ‘पीएचसी’ स्तरावर कोविड केअर सेंटर; उभारणीच्या कामाला गती

प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह आवश्यक सामग्री

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 1 : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन ग्रामीण भागात प्रभावी उपचारयंत्रणा निर्माण व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असून, केंद्रांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 20 केंद्रांवर कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल. त्यानंतर इतरही ठिकाणी उपचार यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. शासन- प्रशासनाच्या विविध प्रयत्नांनी बाधितांची संख्या कमी झाली असली तरी  संभाव्य तिस-या लाटेचा धोका ओळखून ग्रामीण स्तरावर उपचार यंत्रणा उभारण्याला गती देण्यात आली आहे, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.   

साथीच्या काळात स्वतंत्र कोविड रूग्णालये, तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विद्यापीठ व पीडीएमसीमध्ये चाचणी सुविधा यासह ऑक्सिजन प्लान्ट उभारणीचाही निर्णय झाला. केवळ साथीच्या काळातच नव्हे तर इतरवेळीही प्रभावी उपचारयंत्रणा सर्वत्र उपलब्ध असावी यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी रुग्णालयांना इमारत निधी उपलब्ध करुन देण्यापासून आवश्यक ती साधनसामग्री गतीने पुरविण्यात येत आहे.  या विविध प्रयत्नांनी कोविडबाधितांची संख्या रोडावली असली तरीही संभाव्य धोके ओळखून उपचार यंत्रणा निर्माण करणे व संसर्ग रोखण्यासाठी दक्षता बाळगणे, सातत्यपूर्ण जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही ही कामे विविध स्तरांतून होत आहेत. यंत्रणांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून नियोजित कामांना गती द्यावी, तसेच कोविडसंदर्भात रुग्णांना उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये सुसज्ज ठेवावीत. त्यासाठी लागणा-या सर्व आवश्यक साधनसामग्रीबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, निधीची कमतरता पडू देणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

             म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात आला असून, 40 खाटांची व्यवस्था केली आहे. म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही साथ पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

ग्रामीण स्तरावरील आरोग्य यंत्रणेसाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन दिले जात आहेत. इतरही सर्व केंद्रांना वेळेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन दिले जातील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती