विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आवश्यक दक्षतापालनाबाबत प्रशासनाकडून ‘डूज अँड डोन्टस्’ जारी

 


विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

आवश्यक दक्षतापालनाबाबत प्रशासनाकडून ‘डूज अँड डोन्टस्’ जारी

 

अमरावती, दि. 10 : पुढील तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दक्षता पाळण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात आले आहे.

तशा सूचनांचे परिपत्रकही प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांच्याकडून निर्गमित करण्यात आले आहे.

काय करावे

वादळी वारा, वीज चमकत असल्यास घरात असल्यास घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनीटे घरातच राहा. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे थांबा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी थांबा. उघड्यावर असाल व सुरक्षित निवारा जवळपास नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांत झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या व लोंबकळणा-या वीज तारांपासून दूर राहा. जंगलात असाल तर दाट, लहान झाडाखाली व उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोलगट जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.

दुर्देवाने वज्राघात झाल्यास

दुर्देवाने वीज पडल्यास बाधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमीनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायपोथेरमियाचा (शरीराचे अतिकमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (माऊथ टू माऊथ) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद झाल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करुन सुरु ठेवावी.

काय करू नये

गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर, टेकड्यांवर, मोकळ्या जागांवर, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, वीजेचे खांब, उघडी वाहने, पाणी आदी ठिकाणे टाळावीत. घरात असाल तर फोन, मोबाईल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज जोडणीला लावू नये. विजा चमकताना व गडगडाट असेल तर वीज उपकरणांचा वापर टाळा. अशावेळी आंघोळ करणे, हात धुणे, भांडी किंवा कपडे धुणे टाळा. काँक्रिटच्या ठोस जमीनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. धातुची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग, इलेक्ट्रिक मीटर आदी प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा. घराबाहेर असाल तर मेघगर्जनेच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लोंबकळणा-या वीजेच्या किंवा कुठल्याही तारेपासून लांब राहा, असे आवाहन जिल्हा नियंत्रण कक्षाचे अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती