पुन्हा संचारबंदी लागू नये म्हणून पंचसूत्रीचे पालन करा

 



पुन्हा संचारबंदी लागू नये म्हणून पंचसूत्रीचे पालन करा

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कळकळीचे आवाहन

अमरावती, दि. 15 : कोरोनाबाधितांची संख्या घटत चालल्याने जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता आणली आहे. उद्योगधंद्यांना चालना मिळावी व जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक पालनाची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकीअंतर्गत मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायजर, तपासणी व लसीकरण या पंचसूत्रीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

       

जिल्ह्यात लागू संचारबंदीत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांसह बहुतांश बिगर जीवनावश्यक सेवाही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू नयेत यासाठी कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एक वर्षाच्या या लढाईत सर्वच क्षेत्रांना झळ पोहोचली आहे. कोरोनाच्या दोन लाटा आल्या. सुरक्षिततेसाठी दोन्हीवेळा संचारबंदी लागू करावी लागली. पहिल्या लाटेनंतर साथ संपेल असे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण वाढू लागले. संचारबंदी व विविध उपायांनी आता दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आता पुन्हा संचारबंदी लागण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी सर्वांची कृतीशील साथ मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.  

            साथ अजूनही संपलेली नाही

गत एका वर्षात स्वतंत्र कोविड रूग्णालये, तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विद्यापीठ व पीडीएमसीमध्ये चाचणी सुविधा, विलगीकरण गृहे, निवारागृहे, ऑक्सिजन प्लान्ट अशा कितीतरी सुविधा उभारण्यात आल्या. लसीकरणाला वेग देतानाच संपर्क, समन्वय व आरोग्यशिक्षणासाठी चार सर्वेक्षणे घेण्यात आली. आताही संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले आहेत. साथ अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

    दंडात्मक कारवाईची वेळ येऊ नये

  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तिस-या लाटेचा धोका रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना उद्योग, व्यावसायिक व नागरिकांचीही साथ मिळाली पाहिजे. नियम न पाळणा-या दुकानांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईची वेळच येऊ नये. कोरोनापासून आपले व इतरांचे, तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

            लसीकरणाला वेग द्यावा

या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रमाला वेग देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू न शकणा-या व्यक्तींसाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स’हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अशा नवनव्या उपक्रमांची अंमलबजावणी करून लसीकरणाचा विस्तार करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती