नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यटनस्थळांचा विकास करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


पर्यटन विकास महामंडळाच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यटनस्थळांचा विकास करा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्यानुसार कामे पूर्ण करतानाच- पर्यटनस्थळावरील स्थानिक बाबींचा समग्र विचार करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

पर्यटन विकास महामंडळाची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देणे यासाठी जेजे स्कूलच्या कलावंतांच्या सहकार्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या पाहिजेत. मोझरी, रिद्धपूर अशा विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. रिद्धपूर येथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही वापरावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.  

                                    दुर्मिळ हस्तलिखीतांचा ठेवा जतन करा

जिल्ह्यातील पौराणिक स्थळी, तसेच संस्थांकडे दुर्मिळ हस्तलिखीत पोथ्या उपलब्ध आहेत. अनेक पोथ्यांचा लेखनकाल पौराणिक आहे. हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी त्यांचे डिजीटायझेशन होणे आवश्यक आहे. विविध तज्ज्ञांची मदत घेऊन हस्तलिखितांच्या डिजीटायझेशनचे काम पूर्ण करावे जेणेकरून हा ठेवा जतन होईल व अभ्यासकांसाठी उपलब्ध राहील.

पर्यटनस्थळी विकासकामे हाती घेताना परिसरातील विविध गोष्टींचा विचार करुन पर्यटनवाढीच्या सर्व शक्यता तपासल्या पाहिजेत. परिसरातील तळे, नैसर्गिक उद्याने, मोकळ्या जागा अशा विविध जागांचा विकास केल्यास पर्यटकांसाठी नानाविध आकर्षणस्थळे निर्माण होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

                        00000  

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती