नांदगावपेठ एमआयडीसी परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली

 




नांदगावपेठ एमआयडीसी परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली

 पालकमंत्र्यांची ‘एमआयडीसी’च्या सीईओंशी महत्वपूर्ण चर्चा

 स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळण्यासाठी प्राधान्य

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


 अमरावती, दि. 3 : जिल्ह्यात नांदगावपेठनजिकच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या शेत जमिनीच्या भरपाई व जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली निघणार असून, लवकरच प्रत्यक्ष कार्यवाही सुरु होणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी बैठकीद्वारे केलेल्या चर्चेत जमीन अधिग्रहणाबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.


 अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यामुळे नांदगावपेठ शिवारातील सुमारे 55 हेक्टर शेती क्षेत्र बाधित होत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुंबई येथे बैठक घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व इतर अधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. नांदगावपेठ येथील पं. स. सदस्य बाळासाहेब देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ बोडखे, बाधित क्षेत्राच्या जमीनीबाबत सुरुवातीपासून सातत्याने प्रश्न मांडणारे ज्ञानेश्वर बारस्कर यावेळी उपस्थित होते.  


 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, नांदगावपेठेतील बाधित क्षेत्राबाबतचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे व आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. हा प्रश्न एका आठवड्यात निकाली काढण्यात येईल, असे सीईओ अनबलगन यांनी यावेळी सांगितले. नांदगावपेठ येथील बाधित क्षेत्राच्या जमीन अधिग्रहणाबाबत प्रलंबित मागणी पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच पूर्ण होणार आहे.  

स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य


 पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की,  औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगांत होणा-या भरतींत स्थानिक बांधवांना प्राधान्याने रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करावेत. अमरावती क्षेत्रातील औद्योगिक विकासाची शक्यता पाहता नव्या देशी- विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करावेत.


कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून नवे उपक्रम भरीवपणे राबवावेत. जिल्ह्यातील मौजे पिंपळविहीर, डिगरगव्हाण, कापुसतळणी, डवरगाव, माळेगाव, चिंचखेड, केकतपूर व वाघोली या गावातील भूसंपादनाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी केले.


औद्योगिक क्षेत्र परिसरातील भूसंपादन, नुकसान भरपाईचे प्रकरणी तातडीने निकाली काढण्यात येतील, तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी होताच रोजगार मेळावे घेण्यात येतील, असे श्री. अनबलगन यांनी यावेळी सांगितले.


         000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती