बालमजूरीच्या अनिष्ट प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करू - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू




जागतिक बालकामगारविरोधी दिन

बालमजूरीच्या अनिष्ट प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करू

- कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

बालकामगार प्रतिबंध अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला निर्देश

अमरावती, दि. 12 :  हसण्याखेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात एकाही लेकरावर मजुरीची वेळ येऊ नये. त्यामुळे बालमजुरीची कलंकित व अनिष्ट प्रथा नष्ट करून बालकामगार मुक्त महाराष्ट्र" घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. बालमजुरी प्रथा समूळ नष्ट करण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याचे कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे केले.

              शासनाच्या कामगार विभागामार्फत दि. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिवसाचे औचित्य साधून बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त कामगार राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, गरीब कुटुंबातील मुलांना हलाखीच्या परिस्थितीमुळे लहान वयातच मोलमजुरी करावी लागते. अतिशय कमी वयात त्यांना कामावर जावे लागते. अशी  वेळ जेव्हा लहान मुलांवर येते ती अवस्था त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. अशावेळी प्रत्येकाने बालमजुरीला नकार दिला पाहिजे व गरजू मुलांना वेळीच मदत केली पाहिजे. कुणीही बालकाला मजुरीवर पाठवू नये व कुणी बालक कौटुंबिक गरजेपोटी कामावर आले तर त्याच्याकडून काम करून न घेता संवेदनशीलता बाळगून त्याला संपूर्ण मदत करावी, असे आवाहन कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले.

बालमजुरी प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा : प्रशासनाला निर्देश

            कामगार कार्यालयाने उद्योग, व्यवसाय आदी ठिकाणी वेळोवेळी तपासणी करून कुठेही बालमजुरी होत असल्यास वेळीच प्रतिबंध करावा व कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी यंत्रणेला दिले. कामगार आयुक्त कार्यालयामार्फत राज्यात गत वर्षात 155 धाडसत्रात राबविण्यात आले असून, 637 बालकामगारांना मुक्त करण्यात आले आहे. हे काम सातत्याने व व्यापकपणे करावे, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले आहेत. बालकामगार संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना पेन्सिल पोर्टल ऑनलाईन उपलब्ध आहे. नागरिकांनीही याबाबत जागरूक राहून कुठेही बालकामगार आढळल्यास माहिती द्यावी, असे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले.

अशी आहे कायद्यातील तरतूद

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 नुसार 14 वर्षांखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. 14 व 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार आणि कमाल 50 हजार रुपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकांस होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होते.

                                    कामगार विभागातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त ‘बाल कामगार’ या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता कामगार विभागामार्फत राज्यभरात बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कामगार आयुक्तालयामार्फत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आज घेण्यात आले. औद्योगिक संघटना आणि असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, बांधकाम व्यावसायिक संघटना, सर्व शासकीय , निमशासकीय संस्था, नागरिकांना बालमजुरीच्या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता तसेच, बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम, 2016 ची माहिती देण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.

प्रत्येक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान आवश्यक

 महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 27(अ) मध्ये कोणत्याही शासकीय कर्मचारी स्वतः किंवा त्यांचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमार्फत किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही व्यक्तीमार्फत त्यांचे घरगुती किंवा इतर कोणतेही काम करण्यासाठी 14 वर्षाखालील मुलास नोकरीत ठेवता कामा नये. अन्यथा ते शिक्षेस पात्र ठरतात, याची सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी जाणीव ठेवावी, असे निर्देशही देण्यात आले आहे.

कोणत्याही आस्थापनेत बालकामगार काम करताना आढळल्यास तसेच धोकादायक आस्थापनांमध्ये किशोरवयीन मुले कामावर लावल्याचे आढळल्यास त्या आस्थापनेची माहिती कामगार विभाग अथवा पोलिस विभागाला वेळेत कळविण्यात यावी. सर्वांनी जागरूकपणे काम करावे, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.

 

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती