जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई - गृहप्रवेश 

 

            अमरावती, दि. 15 : कोरोना साथीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत दूरस्थ प्रणालीद्वारे आयोजित महाआवास योजनेचा ई- गृहप्रवेश सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यात अमरावती जिल्ह्यातील आवास योजनेच्या लाभार्थ्यांचाही ई-गृहप्रवेश झाला. ग्रामविकास विभागाच्या महाआवास अभियानामुळे महाराष्ट्रात तब्बल 3 लाख 22 हजार लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे. यापुढेही या अभियानात अधिकाधिक पात्र व्यक्तींना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहूल शेवाळे, खासदार विनायक राऊत,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते.

       महाआवास अभियानामुळे महाराष्ट्रात तब्बल 3 लाख 22 हजार लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे. या अभियानात कोरोना काळात देखील उत्तमरित्या नियोजन करून गवंडी प्रशिक्षण देऊन चांगल्या दर्जाचे घरे बांधण्यात आले. उमेद अभियानातील महिला बचत समूहांनी घरकुल मार्ट सुरु करून घरे उभारण्यासाठी लागणारे सर्व साहित्य रास्त दरात स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून दिले. जलदगतीने हे मोठे काम पूर्ण झाले. आज महाआवास अभियानातून हक्काचे घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराला, स्वत:च्या कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचे वचन मला द्यावे, कारण यातूनच गाव आणि राज्याचा कोरानामुक्तीचा प्रवास यशस्वी होणार आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.  

 

                                                जिल्ह्यातही प्रातिनिधीक स्वरूपात चावी वाटप  

            अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक श्री. कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भातकुली तालुक्यातील दाढी येथील रामराव म्हात्रे, गोपाळ सोळंके, विजय काटेकर, लक्ष्मीबाई चेंडकापुरे आदी लाभार्थ्यांना चावी देऊन ई- गृहप्रवेश करण्यात आला. जिल्हा परिषदेत  आयोजित ई- गृहप्रवेश कार्यक्रमाला वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, जि. प. सदस्य अभिजित बोके, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंजनगाव बारी येथील प्रवीण टवलारे, शिराळा येथील प्रणव शिरसाठ, नांदुरा येथील विजय उके, वाकी रायपूर येथील रामकृष्ण नांदणे आदी लाभार्थ्यांना चावी देऊन ई-गृहप्रवेश देण्यात आला.

                                    अभियान कालावधीत जिल्ह्यात अनेक कामे पूर्ण

            गेल्या वर्षभरापासून कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात योजना अंमलबजावणीत अडथळा आला. परंतु, या परिस्थितीत ग्रामविकास विभागाने गतीने कामे करून 200 दिवसांचे महाआवास अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले. अमरावती जिल्ह्यात महाआवास अभियानाच्या माध्यमातून 5 हजार 79 लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच राज्य पुरस्कृत योजनेत 20 हजार 27  लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली. तसेच अभियान काळात अमरावती जिल्ह्यात 8 हजार 500 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.  

         

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती