महिला बचत गटाच्या शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ - महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

 













‘माविम’तर्फे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते

 शेतकरी महिलांना बी-बियाणे व औषधींचे वितरण

 

        महिला बचत गटाच्या शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ

               

                                       -महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 22 : ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली तर त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातील महिलांवर येते. अर्ध्यावर सोडलेला संसाराचा गाडा महिला स्वकर्तृत्वाने समोर नेते. अशा माताभगिनींना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. बियाणे निर्मितीच्या क्षेत्रातही व इतरही शेतीपूरक व्यवसायांत चांगली संधी असून, त्यासाठी महिलाभगिनींनी पुढाकार घ्यावा. अशा उपक्रमाला आवश्यक बळ मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिली.

चांदूर बाजार येथील टाऊन हॉलमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याव्दारे आयोजित कार्यक्रमात स्वंय सहाय्यता महिला बचत गटातील शेतकरी महिलांना बि- बियाणे व औषधींचे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी नितीन सोसे, मंगेश देशमुख, माविमचे संनियंत्रण अधिकारी केशव पवार, सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा अनिता शिंगाळे, कृषी सहायक प्रवीण मोहोड, पुष्पाताई बोंडे यांच्यासह बचतगटाच्या महिला मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. बचत गटाच्या महिलांनी माविमच्या सहकार्याने आपापल्या गावात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पेरणीच्या दिवसांत बियाण्यांची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेता महिला बचत गटांनी उत्तम दर्जाचे बियाणे कसे निर्माण करता येईल यासाठी नियोजन करावे. माविमव्दारे आज वितरीत होणाऱ्या बियाण्यांच्या बॅगच्या माध्यमातून आणखी बियाणे कसे तयार करता येईल, यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन तसे नियोजन करावे. पुढच्या वर्षी आपल्या बचतगटाव्दारे बियाणे विक्री व्हावी, असा निश्चय करुन एकजुटीने प्रयत्न करावे. उत्पादित बियाणे किंवा शेतीपूरक मालाचे मार्केटिंगसाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल.

                                    बचत गटांच्या उत्पादनांच्या विपणनासाठी दिवाळीपासून उपक्रम

बचतगटातर्फे एखादा कुटीर उद्योग, ग्रामोद्योग उभारावा. त्यासाठी निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल. येत्या दिवाळी पासून चांदूर बाजार तालुक्यातील बारा गावांत बचतगटाव्दारे उत्पादित मालाच्या विक्रीचा उपक्रम राबविला जाणार आहे. यातही महिलांनी आपला सहभाग नोंदवावा. बचतगटांना उद्योग उभारणीसाठी बँकेद्वारे कर्ज दिले जाते. त्यासाठी नियोजन करुन लघु उद्योग उभारावा. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रयत्न केला जाईल. बँकेद्वारे तालुक्यात तसेच गावांत गोदाम निर्मितीसाठी बचतगटांनी समोर यावे. जागेची व्यवस्था झाल्यास गोदाम निर्मितीसाठी आमदार निधीतून निधी दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माविम, जीआयझेड व बायेर यांच्या संयुक्तपणे तालुक्यातील शेतकरी महिलांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कंपन्यांच्या सीएसआर फंड मधून पाच हजार रुपयाचे बि बियाणे व किटकनाशक औषधी शेतकरी महिलांना वितरीत केल्या जात आहे. जिल्ह्यात साडे सहा हजार बचतगट कार्यरत असून सुमारे 70 हजार महिलांचा त्यात समावेश आहे.  सर्व गटांव्दारे माविमच्या दशसुत्रीचे पालन केल्या जात आहे. या बचत गटांना आतापर्यंत सुमारे 32 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून त्यांची शंभर टक्के कर्ज परतफेडची टक्केवारी आहे. महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व योजनांचा लाभ दिला जात आहे. चांदूर बाजार तालुक्यात 350 बचतगट कार्यरत असून यात 200 शेतकरी महिला सदस्यांचा समावेश आहे. यातील 87 शेतकरी महिलांना सोयाबिनचे बियाणे तर 113 शेतकरी महिलांना कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. सोसे यांनी यावेळी दिली.

यावेळी बचतगटाच्या सात शेतकरी महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात बि-बियाणे व औषधींचे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती