मेळघाटातील नियोजित कामे गतीने पूर्णत्वास न्या - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


 







जिल्हाधिकाऱ्यांचा मेळघाट दौरा

मेळघाटातील नियोजित कामे गतीने पूर्णत्वास न्या

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. १५ : मेळघाटातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांची, तसेच रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करावी. वनविभागाच्या परवानगीसाठी प्रलंबित कामांबाबत सातत्याने पाठपुरावा करा व कामांना चालना द्या,  असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले.

 

          जिल्हाधिकाऱ्यांनी मेळघाटमधील खडीमल येथे पाणी टंचाईच्या अनुषंगाने, तसेच विविध कामांच्या अनुषंगाने चिखलदरा तालुक्यातील काही गावांना भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार माया माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

खडीमल येथील पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विहिरींचीही पाहणी केली. येथे नियोजित पाणी पुरवठा योजना गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

माखला- सेमाडोह दरम्यान रस्त्याची पाहणी त्यांनी केली व आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. चिखलदरा तालुक्यातील रस्त्यांच्या  कामांबाबत वनविभागाकडील प्रलंबित परवानगी प्रक्रिया गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

 

या दौर्‍यात जिल्हाधिकाऱ्यांनी चुनखडी येथे भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली. चुनखडी येथे सौभाग्य योजनेअंतर्गत सौर पॅनल घरोघरी बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. वीज नसलेल्या गावांमध्ये प्रभावी सौर ऊर्जा यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी काटकुंभ येथे भेट देऊन अमृत सरोवर कामाची पाहणी केली. अमृत सरोवर योजनेची जिल्ह्यात 75 जलाशये साकारली जाणार आहेत. जलसंवर्धनाच्या दृष्टीने ही अत्यंत उपयुक्त योजना असून ती कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत, असे आदेश त्यांनी दिले.

 

          मेळघाटात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगाच्या माध्यमातून जलसंधारण, रस्ते, बांधकाम आदी विविध कामे सातत्याने राबवावीत जेणेकरून नागरिकांना रोजगारासाठी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही,असे त्यांनी यावेळी सांगितले. काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी उपचार सुविधांचा आढावा घेतला

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती