जिल्ह्यात 1 जुलैपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा; घरोघर होणार झिंक, ओआरएसचे वाटप विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम राबवा - लसीकरण आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे निर्देश

 





जिल्ह्यात 1 जुलैपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा; घरोघर होणार झिंक,

ओआरएसचे वाटप

विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम राबवा

 

-  लसीकरण आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे निर्देश

 

          अमरावती, दि. १३ : जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे प्रमाण केवळ 55 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळा स्तरावर मोहिम घेण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

         जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा व अतिसार नियंत्रण पंधरवड्याबाबत नियोजन बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निर्वाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. प्रशांत घोडाम आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पालकांना प्रोत्साहित करा

 जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, जिल्ह्यात अद्यापपर्यंत प्रथम मात्रेचे 85.53 टक्के व दुस-या मात्रेचे 62.34 लसीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या 15 ते 18 वयोगटात प्रथम मात्रेचे 55.67 आणि दुस-या मात्रेचे 37.64 टक्के, तसेच 12 ते 14 वयोगटात प्रथम मात्रेचे 52.33 टक्के आणि दुस-या मात्रेचे 22.30 टक्के लसीकरण झाले आहे. राज्याचे सरासरी प्रमाण 64.76 टक्के आहे. भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे 82 टक्के लसीकरण झाले आहे.  या तुलनेत जिल्ह्यातील प्रमाण कमी असून, ते वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

लसीकरण ही बाब ऐच्छिक आहे. तथापि, त्याचे महत्व नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या विशेषत: पालकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे जेणेकरून नागरिक लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येतील. त्यासाठी पंधरवडाभर सातत्यपूर्ण जनजागृती करावी. शाळा सुरू होताच शिबिरे आणि जागृती कार्यक्रम घ्यावेत. केंद्रांवर सेल्फी पॉईंटबरोबरच इतर अनेक अभिनव संकल्पना राबवाव्यात. त्यादृष्टीने शाळानिहाय नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

घरोघर होणार झिंक, ओआरएसचे वाटप

जिल्ह्यात 1 ते 15 जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा घेण्यात येईल. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे त्याचे ध्येय आहे. अतिसार असलेल्या सर्व मुलांना ओआरएस आणि झिंकचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन आणि अतिजोखमीची क्षेत्रे, तसेच दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात जिल्ह्यात 1 लाख 63 हजार बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने आदी सर्व ठिकाणी ‘ओआरएस व झिंक कॉर्नर’ स्थापून त्याचे विनामूल्य वाटप होईल. त्याचप्रमाणे, आशासेविकांच्या माध्यमातून गृहभेटी देऊन वाटप करण्यात येईल, तसेच ओआरएस तयार करण्याच्या पद्धती, हात धुण्याचे महत्व याबाबत माहितीही दिली जाईल. नागरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध विभागांनी समन्वय ठेवून ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती