टंचाईच्या अनुषंगाने जि. प. सीईओंची खडीमल गावाला भेट

 






टंचाईच्या अनुषंगाने  जि. प. सीईओंची खडीमल गावाला भेट

खडीमलच्या टंचाई निवारणासाठी टँकरची क्षमता वाढवली

कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला गती देणार

- जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

 

अमरावती, दि. 9 : चिखलदरा तालुक्यातील खडीमल येथील पाणीटंचाई निवारणासाठी दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर सुरू करण्यात आले असून, तिथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी सांगितले.

चिखलदरा येथील खडीमल येथील ग्रामस्थ बांधवांच्या पाणीटंचाईबाबत तक्रारीची दखल घेत श्री. पंडा यांनी स्वत: खडीमल येथे बुधवारी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावलकर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.            

खडीमल हे चिखलदरा तालुक्यातील सुमारे 1200 लोकसंख्येचे गाव आहे. नवलगाव व खडीमल या दोन्‍ही गावांना नवलगांव येथून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. उन्‍हाळ्यात पाणीपुरवठा योजनेच्‍या विहीरीचे पाणी कमी पडत असल्‍यामुळे या योजनेमधून उन्‍हाळ्यात केवळ नवलगावला पाणीपुरवठा होतो. त्‍यामुळे खडीमल गावाला पाणीटंचाई निवारणार्थ खडीमल गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्‍यात येतो.

त्यानुसार यावर्षी खडमल गावाला 28 मेपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्‍यात आला. टॅंकरद्वारा खडीमल गावातील विहीरीत पाणी सोडण्‍यात येते.एकाच वेळी अधिक जास्‍त लोकांना पाणी भरता यावे यासाठी ग्रामपंचायतीच्‍या सुचनेनुसार विहीरीत पाणी सोडण्‍यात येते. यापूर्वी पाच हजार लीटर क्षमतेचा टॅंकर पाठवून एका विहीरीत पाणी सोडण्‍यात येत होते. तथापि, तिथे होणारी गर्दी पाहता दि.7 जूनपासून 10 हजार लीटर क्षमतेच्‍या 2 टॅंकरद्वारा दोन विहीरींत पाणी सोडण्यात येत आहे. त्‍यामुळे विहीरीवरील पाणी भरणा-यांची गर्दी कमी होईल.

कायमस्वरूपी योजना कार्यान्वित करणार

श्री. पंडा म्हणाले की,  जलजीवन मिशनमध्ये या गावासाठी सुमारे 80 लक्ष रू. निधीतून कायमस्‍वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्‍यात आली.  त्याचे आदेश दि. 18 जानेवारी 2022  रोजी देण्‍यात आले. तथापि, या योजनेचे काम सिपना वन्‍यजीव क्षेत्रामध्‍ये येत असल्‍यामुळे वनविभागाची परवानगी आवश्‍यक आहे. वनविभागाची परवानगी घेण्‍यासाठी रीतसर प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला आहे व त्याचा प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा होत आहे. ही परवानगी प्राप्‍त होताच पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करुन या गावाची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्‍यात येईल.

 

 

विविध कामांचा आढावा

            यावेळी श्री. पंडा यांनी आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला भेट देऊन आढावा घेतला. औषध साठा, उपचार सुविधा, कुपोषण निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी आदी आढावा त्यांनी घेतला.रोहयो कामांच्या अनुषंगाने आढावाही श्री. पंडा यांनी घेतला. मनरेगाच्या माध्यमातून परिसरात अधिकाधिक कामे राबवावीत जेणेकरून रोजगारनिर्मिती वाढेल, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती