शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू





 

जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून पशुसंवर्धन व जलसंपदा विभागाचा आढावा

शेतीपुरक व्यवसायातील अडचणींबाबत सर्वेक्षण करा

-          राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती दि. 08 (विमाका): चांदुर बाजार व अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडील दुभत्या, भाकड जनावरांच्या माहितीच्या संकलनाबरोबरच शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांची माहिती कोष्टक स्वरूपात सादर करावी. याबाबत सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिले.

पशुसंवर्धन व जलसंपदा विभागाच्या विविध विषयांचा आढावा शासकिय विश्रामगृहात  घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ राजेंद्र पेठे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ पुरुषोत्तम सोळंके आदी उपस्थित होते.

चांदुर बाजार तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. आवश्यक जागेच्या मागणीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले असून रुग्णालयानजिक असलेला पशुवैद्यकीय दवाखाना नगरपंचायतीच्या जागेवर तातडीने स्थलांतरित करण्यात यावा. यासाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून हा प्रस्ताव देऊन  पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले.

पुनवर्सन प्रक्रियेतील समस्या प्राधान्याने सोडवाव्या

            मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा  घेताना १७० कुटूंबियांच्या घराच्या मुल्यांकनात राहिलेल्या त्रुटीबाबत अहवाल सादर करण्यात यावा. तक्रारदात्यांच्या घराच्या फेरमुल्यांकनाची प्रक्रिया व त्याबाबतचे फेरनिवाडे तात्काळ करण्यात यावे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. वरुड तालुक्यातील नागठाणे गावाला मुबलक पाणी मिळण्यासाठी जलवितरण वाहिनीतील दोष दुर करणे व  पुरेसा विसर्ग  मिळणे आवश्यक आहे. हे काम संबंधित कंत्राटदाराने पुर्ण न केल्यास त्याला काळया यादीत टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. मुख्य अभियंता अभय पाठक, अधिक्षक अभियंता मेघा आक्केवार, उपविभागीय अभियंता सोहन मडघे आदी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती