अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंधासाठी अधिकाधिक ‘स्यू-मोटो’ कारवाया करणार समितीच्या बैठकीत चर्चा

 





अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंधासाठी अधिकाधिक ‘स्यू-मोटो’ कारवाया करणार

समितीच्या बैठकीत चर्चा

अमरावती, दि. 9 : अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंधासाठी अधिकाधिक प्रमाणात ‘स्यू-मोटो’ कारवाया करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला.

अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी विरोधी कार्यकारी समिती स्थापण्याचे गृह विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार आयुक्तालयाकडून समिती गठित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार समिती कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईचा आढावा घेणे, टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही यासाठी लक्ष ठेवणे, जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ति केंद्रांशी समन्वय राखणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, एनडीपीएसअंतर्गत गुन्ह्यांचे तपासी अधिकारी यांना प्रशिक्षण देणे आदी समितीची कार्ये आहेत.

 या समितीच्या सदस्यांची बैठक आयुक्तालयात आज झाली.  पोलीस उपायुक्त विक्रम साळी,  सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोल नरोटे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी उमेश घरोटे, केंद्रिय वस्तू व सेवा कर अधिक्षक जी. बी. देशमुख, अधिक्षक उमेश खोडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, टपाल विभागाचे सहायक अधिक्षक अतुल काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे आदी उपस्थित होते.

औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या लेबलखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. अधिकाधिक स्यू-मोटो कारवाया कराव्यात, असा निर्णय बैठकीत झाला.      

जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवणे हेही समितीचे कार्य आहे. त्यानुसार चालू कारखान्यांप्रमाणेच तसेच बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी करावी. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देश श्री. साळी यांनी दिले. तपास यंत्रणांना आवश्यक प्रशिक्षण लवकरात लवकर आयोजित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

विविध विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. व्यसनमुक्ति केंद्राशी समन्वय ठेवावा, आदी विविध निर्देश बैठकीत देण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. ठोसरे यांनी समितीची कार्यपद्धती व कार्यवाहीची माहिती दिली.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती