परतवाड्यात रविवारी बालकांसाठी नि:शुल्क हृदयरोग तपासणी शिबिर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पुढाकार

 


परतवाड्यात रविवारी बालकांसाठी नि:शुल्क हृदयरोग तपासणी शिबिर

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पुढाकार

श्री सत्यसाई संजीवन सेंटरचे सहकार्य; गरजू बालकांना शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देणार

 

            अमरावती, दि. 10 :  जलसंपदा, कामगार, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून परतवाड्यात रविवारी बालकांसाठी विनामूल्य हृदयरोग तपासणी शिबिर होईल. मुंबईतील नामवंत तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

नवी मुंबईतील श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर आणि यवतमाळ येथील श्री सत्यसाई संजीवनी माता-बाल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर परतवाड्यातील अग्रेसन भवनात रविवारी (दि. 12 जून) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.  

 या एक दिवसीय शिबिरात बालक, कुमार, विद्यार्थी आदी 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी विनामूल्य हृदयरोग तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्यांची हृदयरोग ‘2D  इको’ तपासणी करण्यात येईल.  नवी मुंबई येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष कुमार बानापूरकर व सत्यसाई संजीवनी सेंटरची चमू उपस्थित राहून तपासणी करणार आहे. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे, अशा रुग्णांची निवड करण्यात येईल. या बाल हृदयरुग्णांवर संस्थेच्या रुग्णालयामध्ये विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येईल.

            श्री सत्यसाई संजीवनी सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. श्रुती प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दर वर्षी दीड ते दोन लाख मुले जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असतात. यातील 50 टक्के मुले वेळेत निदान व उपचार न मिळाल्यामुळे दगावतात. श्री सत्यसाई संजीवनी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने रायपूर- छत्तीसगड, पलवाल- हरियाणा, खारघर -नवी मुंबई येथे श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालय कार्यरत आहेत. गेल्या 9 वर्षात सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड संस्थेमार्फत 19 हजाराहून अधिक 40 हार्ट सर्जरी यशस्वी केल्या आहेत आणि 150000 हुन अधिक मुलांचे ओपीडी मध्ये उपचार केले आहेत.

            अचलपूर तालुक्यातील रुग्णांकरिता हे शिबिर परतवाड्यात अग्रसेन भवन  येथे आयोजित करण्यात आले आहे. विनामूल्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींना घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांच्यामार्फत देण्यात येत आहे. हे शिबिर यशस्वी करण्याकरता शासनाकडून तालुका आरोग्य अधिकारी व डॉक्टरांची टीम, सर्व आरोग्य कर्मचारी तसेच श्री अग्रवाल समाज संघटन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती