Tuesday, June 2, 2020

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता


पत्ता न सांगता येणारी मूक भगिनी स्वगृही रवाना

                                                        









आधार प्रणालीची मदत

 

अमरावती, दि. 2 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या व येथील जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका भगिनीची व्यथा जाणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या सतत प्रयत्नाने आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून, या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.  

            या भगिनीचे नाव के. मंजुळा असून, त्या आंध्रप्रदेशातील आहेत. आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील त्या रहिवाशी आहेत.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी साडीचोळी देऊन या भगिनीला निरोप दिला. तिच्या गत महिनाभरातील वास्तव्याने स्नेह निर्माण झालेल्या पारिचारिका भगिनींना व सर्वांना के. मंजुळा यांनी हात हलवून निरोप दिला. घरी परतण्याचा आनंद त्यांचा चेह-यावर झळकत होता. पालकमंत्र्यांसह सगळेच यावेळी भारावून गेले होते.

सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलीसांना आढळले. ती मूक असल्याने संवाद होत नव्हता. प्रशासनाने तिला क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, या महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इर्विन रूग्णालयात दि. ६ मे रोजी १०८ रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकला नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेऊन दिलासा दिला.

दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिकांनी तिची काळजी घेतली.

 

                       

बोटांच्या ठस्यांच्या आधारे आधार प्रणालीतून शोध

 

या भगिनीच्या हातवा-यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीचा डेटा तपासून त्याआधारे शोधून काढण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणेकडूनही शोध मोहिम सुरूच होती. महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर रोज त्याचा पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार या अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

 

आधार प्रणालीच्या साह्याने हातांच्या ठस्याच्या आधारे या महिलेचा पत्ता सापडला. त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांच्यासह प्रशासन, जिल्हा रूग्णालयातील स्टाफ यांनी आनंद व्यक्त केला. आप्तस्वकीयांच्या आठवणीने रोज अश्रू ढाळणा-या या भगिनीपर्यंत ही पारिचारिकांनी ही माहिती सांकेतिक खुणांनी पोहोचवली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिला पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून कुर्नुल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्या. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले. तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.    

या मूक भगिनीला तिच्या घरापर्यंत पोहोचून कुटुंबिय व आप्तांना भेटता येणार आहे, याचा मोठा आनंद आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना जिल्हा रूग्णालयातच ठेवले होते. या काळात त्यांची व इतरही रुग्णांची अविरत सेवा करणा-या सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणा-या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

 

00000

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...