जिल्ह्यात अतिदक्षता सुविधांची गरज लक्षात घेऊन आवश्यक प्रस्ताव द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 19 : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अत्यंत थोड्या कालावधीत सुपर स्पेशालिटी रूग्णालयात सुसज्ज कोविड-19 जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील अतिदक्षता सुविधांत वाढ होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यादृष्टीने यापुढेही कोविड-19 च्या केसेसच्या अपेक्षित संख्या व आयसीयु सुविधांची गरज लक्षात घेऊन आवश्यक त्या सुविधांत वाढ होण्यासाठी प्रस्ताव आदी कार्यवाही तत्काळ करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयसीयू सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुविधांची यादी निर्गमित केली आहे. या सर्व सुविधा जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. सर्वसामान्य वॉर्डलाही अतिदक्षता विभाग (आयसीयु) व हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये (एचडीयु) रूपांतरित करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड- 19च्या केसेसच्या अपेक्षित संख्येचा आढावा घेऊन अधिकच्या आयसीयु बेडची आवश्यकता तपासावी. आवश्यकता भासणार असल्यास आयसीयु क्षमता वाढविण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.   

आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने निश्चित केलेल्या निकषांनुसार अतिदक्षता विभागात आयसीयु बेडस्, एअर मॅट्रेसेस, रेडियंट वॉर्मर, ऑक्सिजन सोर्स, कम्प्रेस्ड एअर, आयसीयु व्हेंटिलेटर्स, नॉन इनवॅसिव्ह व्हेंटिलेशन मोडलिटी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, मल्टिपुरा मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर, एईडीसह डिफायब्रिलेटर, इन्फ्यूजन पंप्स, नेब्युलायझर, ईसीजी मशिन, डिस्पोझेबल ब्लेडसह व्हिडीओ लॅरिगोंस्कोप, ब्रोंकोस्कोप, हेमो-डायलिसीस मशिन, इंटरमिटंट लेग कम्प्रेशन मशिन, क्रॅश कार्ट, सीआर सिस्टमसह मोबाईल एक्स-रे युनिट, पोर्टेबल अल्ट्रासाऊंड मशिन, एबीजी मशिन, ग्लुकोमीटर आदी सुविधा असणे आवश्यक आहे. 

यापैकी अनेक सुविधा यापूर्वीच सुपर स्पेशालिटी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या आहेत. त्याखेरीज इतरही सुविधांची गरज असल्यास तसा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यासाठी ठिकठिकाणच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी येथील विभागीय संदर्भ रूग्णालयात स्वतंत्र कोविड रुग्णालय स्थापण्यात आले आहे. रूग्णालयाच्या तळमजल्यावर नोंदणी विभाग तयार करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर कोविड 19- संशयित तपासणी व विलगीकरण कक्ष 1 व 2, तसेच दुस-या मजल्यावर रूग्णकक्ष आहे. चौथ्या मजल्यावर आयसीयु कक्ष 1 व 2 निर्माण करण्यात आला आहे. त्याशिवाय, जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. उपचारांच्या दृष्टीने विविध सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. मात्र, पुढील काळातील गरजा लक्षात घेऊन इतरही सुविधा आवश्यक असल्यास तसे प्रस्ताव वेळेत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती