पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन


   जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अधिकाधिक राबवा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 : जिल्ह्यात भविष्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सर्वदूर जलसमृद्धी निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव जलसंधारणाची कामे अधिकाधिक राबवावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

            मृद व जलसंधारण विभागातर्फे भातकुली तालुक्यातील नाला खोलीकरण, तसेच सुमारे 50 लक्ष रूपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड. मुकद्दर खाँ पठाण यांच्यासह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

भातकुली तालुक्यात कामनापूर व देवरी निपाणी येथे प्रत्येकी नऊ लक्ष रूपये निधीतून, तर अनकवाडी, हातखेडा, वंडली, खारतळेगाव येथे प्रत्येकी सात लक्ष रूपये निधीतून जलसंधारणाची विविध कामे राबविण्यात येत आहेत. हे प्रत्येक काम विहित मुदतीत व उत्तम दर्जा राखून पूर्ण करावे. त्यासाठी अधिकारी व संबंधितांनी वेळोवेळी पाहणी करून काम योग्यपद्धतीने होत असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गावोगाव नाला खोलीकरण, पाण्याच्या जुन्या स्त्रोतांचे पुनरूज्जीवन, शेततळे आदी कामे सातत्याने आणि सर्वदूर राबवली गेली पाहिजेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिकठिकाणी अधिकाधिक पूरक जलसंचय साधने उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे व काम विहित मुदतीत पूर्ण होईल, यासाठी गतीने अंमलबजावणी करावी.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, पाण्याच्या नाले आदी नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे. अशा कामांमध्ये आवश्यक त्या सर्व ठिकाणी लोकसहभाग मिळवावा. त्यामुळे पेयजलासह शेतीला पाण्याचा प्रश्नही मिटेल. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली आहेत. जिल्ह्यात खारपाणपट्ट्यासारख्या परिसरात शेततळ्यांची संख्याही मोठी आहे. तेथील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अशा कामांवर अधिक भर द्यावा.

भविष्यात वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पाण्याचे विविध स्त्रोत सतत निर्माण करत राहून गावे जलपरिपूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाची गरज आहे. यादृष्टीने विभागाने जलसाक्षरता वाढविण्यासाठी लोकशिक्षणावरही भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.  

यावेळी पालकमंत्री श्री. ठाकूर यांनी जलसंधारणाच्या अपेक्षित कामांचा परिसर, स्थानिक भौगोलिक रचना व पाणी साठा यांची माहिती अधिका-यांकडून घेत प्रत्यक्ष स्थळांचीही पाहणी केली व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण केले.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती