Tuesday, June 23, 2020

पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास मान्यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी

पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभास मान्यता

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी

 

अमरावती, दि. 23 : जिल्ह्यात 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पाडण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.कोरोना संकटात लागू लॉकडाऊनमध्ये मिशन बिगीन अगेन मोहिमेद्वारे शिथीलकरण आणण्यात आले आहे. त्यानुसार 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडता येईल. जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहे, घर व घरानजिकच्या परिसरात लग्नसमारंभ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल. मात्र, मिरवणूक काढता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीला समारंभाला उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे, प्रतिबंधित क्षेत्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत असलेल्या मंगल कार्यालये, सभागृह बंद राहतील.  

लग्न करणा-या पक्षाने समारंभाची परवानगी अमरावती महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांकडून, नगर परिषदेच्या क्षेत्रात मुख्याधिका-यांकडून, तर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांकडून मिळवावी. त्यासाठी त्यांना अर्जासह उपस्थितांची यादी देणे बंधनकारक आहे. दक्षता नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर कारवाई करण्याचे जबाबदारी या परवानगी प्राधिका-यांना देण्यात आली आहे.

हॉल किंवा सभागृह किंवा विवाहाच्या स्थळाचे, तसेच समारंभात हाताळण्यात येणा-या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. हॉलच्या कार्यालयातील काऊंटरचे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करावे. समारंभात किमान एक मीटर सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळावे. हॉलच्या कर्मचा-यांनीही मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. गरज भासल्यास किंवा लक्षणे आढळल्यास कर्मचा-यांची तत्काळ तपासणी करावी. कोरोना प्रतिबंध दक्षतेबाबत सूचनांचा फलक दर्शनी भागात लावावा. नियमांचे पालन होत नसेल तर अशा व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असे सुस्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.

समारंभात गर्दी होऊन कोविड-19 चा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखरेख करण्याचे आदेश आहेत.

                          

हॉलचालकांवरही जबाबदारी

 

समारंभात प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, मास्क, तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉन, मॅरेज हॉलच्या संचालकाची असेल. आवारात पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यास प्रतिबंध करावा. सभागृहात गर्दी होणार नाही, याचीही काळजी त्यांनी घ्यावी. गर्दी  वाढत असल्याचे लक्षात येताच हॉलचालकाने तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला सूचित करावे व हॉल तत्काळ बंद करावा. असे न केल्यास व गर्दी वाढल्याचे आढळल्यास संबंधित हॉल, सभागृह सील करण्याची फौजदारी कार्यवाही परवानगी देणा-या प्राधिका-यांनी करावी, असेही जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत.

 

आरोग्य सेतू बंधनकारक

 

लग्न समारंभास उपस्थित राहणा-या सर्वांनी आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

                                    000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...