सकारात्मकता जागविण्यासाठी कृषी अधिकारी - कर्मचा-यांना मेडिटेशनचे प्रशिक्षण

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतील उपक्रम                

              





                                          

शेतकरी बांधवांसाठीही कार्यक्रम राबविणार

                         -          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 16 : कोरोना संकटकाळच नव्हे तर इतरही काळात नैसर्गिक आपदा, संकटे, ताणतणावांचे प्रसंग अशा कठीण काळात सकारात्मकता वाढविण्यासाठी व मनोबल दृढ ठेवण्यासाठी मेडिटेशनची खूप मदत होते. त्यामुळे कोरोना संकटकाळात ज्याप्रमाणे कोरोना वॉरिअर्ससाठी मेडिटेशन प्रशिक्षण घेतले,  तसेच मेडिटेशन कार्यक्रम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही आयोजित करण्याचा मनोदय महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून गत दोन महिन्यात कोरोना संकटकाळात अहोरात्र राबणा-या प्रशासनातील व विविध दलांतील अधिकारी, कर्मचारी, जवानांसाठी मेडिटेशन शिबिरे सातत्याने राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेकडोजणांना या शिबिरांचा लाभ होत आहे. कृषी विभागाच्या विसावा कॉलनीतील कार्यालयात आज कृषी अधिकारी व कर्मचा-यांसाठी शिबिर घेण्यात आले. प्रशिक्षक शिवाजीराव कुचे यांनी सकारात्मक ऊर्जा जागविणा-या विविध बाबींचे प्रशिक्षण यावेळी उपस्थितांना दिले. पालकमंत्र्यांनी स्वत: पूर्णवेळ थांबून प्रशिक्षणात सहभाग घेतला. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, कृषी उपसंचालक अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.  

शाळा- महाविद्यालयीन परीक्षा, विद्यार्थ्यांमध्ये येणारा तणाव, नैराश्य, आत्महत्यांच्या घटना, पालकांची स्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ‘मस्ती की पाठशाला’ हा उपक्रम प्रशिक्षक शिवाजीराव कुचे यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी राबविला. श्रीमती ठाकूर यांनी स्वत:  शाळा-शाळांमध्ये जाऊन विविध विषयांचे धडे दिले. गत 11 वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे.

 कोरोना संकटकाळात अहोरात्र राबणा-या डॉक्टर, पारिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी, आरोग्यसेवक, इतर विभागांचे अधिकारी यांच्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  खरीप हंगामात कृषी विभागावरील वाढलेली जबाबदारी लक्षात घेऊन कृषी विभागातील अधिका-यांसाठी कार्यक्रम घेतला. यापुढील काळात शेतकरी बांधवांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एक छोटा सकारात्मक विचार अनेक कामांना गती देतो. त्यामुळे मनातून नकारात्मकता काढून टाकणे व सकारात्मक ऊर्जा जागविणे यासाठी मेडिटेशन आवश्यक आहे. केवळ विविध क्षेत्रांत काम करणा-या यंत्रणांनाच नव्हे, तर कौटुंबिक ताणतणावांचे निरसन करायलाही त्यामुळे मदत होते, असेही यावेळी श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

मेडिटेशनचे 144 प्रकार आहेत. त्यातील जिब्रिश (कॅथर्सिस) प्रकाराद्वारे निगेटिव्हिटी दूर होते. सक्रिय ध्यानाची ताकद मोठी आहे. संकटावर मात करण्याची ऊर्जा त्यातून मिळते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून यापूर्वी महिला बचत गटांसाठीही प्रशिक्षण राबविण्यात आले. तब्बल 1 हजार 800 महिलांनी त्यात समरसून सहभागी झाल्या होत्या, असे श्री. कुचे यांनी यावेळी सांगितले. मंत्रोच्चार, हमिंग आदी बाबींचीही माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित सुमारे शंभर कृषी अधिकारी- कर्मचा-यांनी मेडिटेशन व ध्यानाची अनुभूती घेतली. हा अनुभव सकारात्मक ऊर्जा जागविणारा होता. कृषी क्षेत्रात येत असलेल्या अडचणी, टोळधाड आदी नैसर्गिक संकटे यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही असा उपक्रम राबविण्याचा निर्णय महत्वपूर्ण आहे, असे सांगून जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी आभार मानले.

                                    00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती