Wednesday, June 24, 2020

सदोष बियाणे तक्रारीची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश तपासणी पथकांची संख्या वाढवावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


 

          अमरावती, दि. २४ : बियाण्याची उगवण होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत.  त्याची तत्काळ दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, तसेच संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई  करण्याची सुस्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून पेरलेले विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत. कोरोना संकटकाळात शेतकरी बांधव आधीच अडचणीत असताना असा प्रकार होणे हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, तपासणी पथकांची संख्या वाढवावी. तपासणी अहवाल तत्काळ उपलब्ध करून द्यावेत. ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाकडून महाबीजला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा कृषी कार्यालयाने तत्काळ महाबीजशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे व या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही वेळेवर केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातून सोयाबीनचे बियाणे उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. 

       जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उगवण न झाल्याबाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयीबीन बियाणे उगवण न झाल्याबाबत महाबीज, राष्ट्रीय विमा निगम, उत्तम सीडस्, बसंत ॲग्रो (विक्रांत) या कंपनीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत पाहणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र 2.94 लाख असून, प्रत्यक्षात 1 लाख 60 हजार 304 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 54.48 टक्के आहे. महाबीजकडून बियाणे बदलून देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सर्वेक्षणातून सर्व तक्रारींचे निराकरण होण्यासाठी तत्काळ अहवाल देण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

         जिल्ह्यात कपाशी क्षेत्राचे सरासरी क्षेत्र 2.04 लाख हेक्टर असून, प्रत्यक्षात 1 लाख 68 हजार 149 हेक्टर क्षेत्रावर (82.42 टक्के) पेरणी झालेली आहे. पावसाचे दिवस जास्त दिसत असले तरी पाऊस समाधानकारक नाही. पाऊस कमी असल्यामुळे इतर घरचे बियाणे पेरलेल्या शेतक-यांच्या सोयाबीन पिकाची सुद्धा हलक्या जमीनीत मोड येत असल्याचे दिसून येत आहे.

        तूर पीकाचे सरासरी क्षेत्र 1. 11 लाख हेक्टर असून अद्यापपर्यंत 62 हजार 298 हेक्टर (55.93 टक्के) तूर पीकाची पेरणी झालेली आहे. मका पीकाचे 84 हजार 460 हेक्टर क्षेत्र असून, मका 6 हजार 963 हेक्टर (82.45 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मूग पीकाचे सरासरी क्षेत्र 84 हजार 460 हेक्टर असून, सुमारे 82 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मूग पीकाचे सरासरी क्षेत्र 24 हजार 992 हेक्टर असून, आतापर्यंत 7 हजार 276  हेक्टर (29.12 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. उडीद पीकाचे 9 हजार 173 हेक्टर क्षेत्र असून, 2 हजार 445 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अनेक पीके उगवणीच्या अवस्थेत असल्याने पावसाची तातडीने आवश्यकता आहे, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

 

                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...