Tuesday, June 30, 2020

शिक्षण राज्यमंत्र्यांचा पुढाकाराने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण



                शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही

-          शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

अमरावती, दि. 30 : कोरोना संकटकाळामुळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शिक्षण, जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनी येथे केले.  

शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी काल परतवाडा येथे शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गट शिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, देवीदास खुराडे यांच्यासह अनेक अधिकारी व शाळांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कोरोना संकटकाळात आरोग्याची सुरक्षितता जपण्यासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागणार आहे. याचअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी 12 अशा 24 जि. प. शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘इझी टेस्ट ॲप’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी व उर्दू दोन्ही माध्यमांच्या शाळांत हा उपक्रम राबवला जाईल.  ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, त्यांच्याही व्यवस्थेबाबत नियोजन होत आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या उपक्रमात सहभागी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. इझी टेस्ट ॲपमध्ये शिक्षण, गृहपाठ, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवादाची सोय, उपस्थितीपत्रक, शैक्षणिक माहिती साठविण्याची सोय उपलब्ध आहे. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त आहे. प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल. त्याशिवाय, इतरही विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...