टाकरखेडा शंभू येथील वीज उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन



वीज उपकेंद्रांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा

    -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 3 : एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरु असताना दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार नियमित वीजपुरवठ्यासाठी वीज उपकेंद्राची कामे नियोजनानुसार विहित मुदतीत पूर्ण व्हावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे (महावितरण) टाकरखेडा शंभू येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सदस्य जयंतराव देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंता गोकुळ मोरे आदी यावेळी उपस्थित होते.  

एच. व्ही. डी. एस. योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये 33 के. व्ही. उपकेंद्र उभारणे व अस्तित्वात असणा-या उपकेंद्रातील क्षमता वाढ करण्याकरिता एकूण 15 कोटी 6 लक्ष रूपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेत अचलपूर तालुक्यातील सावळापूर, भातकुली तालुक्यातील आष्टी (टाकरखेडा शंभू), चांदूर बाजार तालुक्यातील बेलारा येथे 5 एम.व्ही. ए. क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र उभारण्याचे काम मंजूर आहे. उपकेंद्रांच्या परिसरातील अनेक गावांना त्यामुळे अखंडित वीजपुरवठा होणार आहे.

टाकरखेडा संभू (आष्टी) येथील 10 एमव्हीए क्षमतेच्या 33 के. व्ही. उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली.  हे उपकेंद्र उभारण्यासाठी अंदाजे सव्वादोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. नियोजनानुसार उपकेंद्राचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मुदतीत काम पूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

22 गावांना होणार अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ

उपकेंद्रात पाच एमव्हीए क्षमतेची दोन रोहित्रे मंजूर असून, एकूण क्षमता 10 एमव्हीए इतकी आहे. या उपकेंद्रातून दोन 11 केव्ही गावठाण व 3 कृषी वाहिन्यांद्वारे पूर्णानगर, टाकरखेडा संभू, रामा, आष्टी, जळका या गावांसह परिसरातील 22 गावांना योग्य दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या उपकेंद्राच्या उभारणीमुळे अस्तित्वात असलेल्या वलगाव व आसेगाव या उपकेंद्राचा विद्युत भार कमी होऊन आष्टी परिसरातील गावांमधील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिक, तसेच शेतकरी बांधवांच्या सुविधेसाठी हे उपकेंद्र लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

भूमीपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी झाला. 

00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती