दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू





 

अमरावती, दि. २७ : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिले.  

            राज्यमंत्री श्री. कडू यांनी कृषी अधिकारी व संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधींची बैठक घेऊन सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, सदोष बियाण्यामुळे पीकाची उगवण न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.  कोरोना संकटामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांपुढे सदोष बियाण्यामुळे आणखी अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यास संबंधित कंपनीने शेतक-यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अन्यथा कृषी विभागाने कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 राज्यमंत्री श्री. कडू पुढे म्हणाले की,  बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर येत आहेत. चांदूर बाजार तालुक्यातून 219, तर अचलपूरमधून 90 हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. या तक्रारींनुसार तत्काळ पंचनामे करण्यात यावेत. संबंधित पथकांनी दोन दिवसात अहवाल सादर करावा.

शेतकरी बांधवांनी या काळात खचून न जाता काही अडचण आल्यास कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय, कृषी कार्यालयात संपर्क साधावा. काहीही अडचण आल्यास तत्काळ माहिती द्यावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले.

यावेळी महाबीज, ग्रीन गोल्ड, वसंत ॲग्रोटेक सीडस्, कोहिनूर सीडस्, उत्तम सीडस्, ईलग सीडस्, ओसवाल सीडस् यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती